Vijay Wadettiwar : दोन जणांच्या सरकारनं शेतकऱ्यांना तत्काळ हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत करावी : विजय वडेट्टीवार
दोन जणांच्या या सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं हेक्टरी 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी राज्याचे माजी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली आहे.
Vijay Wadettiwar on State Govt : मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर होईल ही चर्चा ऐकून-ऐकून आम्ही थकलो आहोत. त्यामुळं दोन जणांच्या या सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं हेक्टरी 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी राज्याचे माजी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली आहे. विदर्भात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला आहे. आता बहुतांशी शेतकरी फक्त रब्बी हंगामावर अवलंबून आहेत. त्यामुळं शेतकरी खचले असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
विदर्भात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला
विदर्भ आणि मराठवाड्याला अतिवृष्टीचा खूप मोठा तडाखा बसला आहे. मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालं आहे. त्यामुळं सरकारनं तत्काळ मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. विदर्भात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला आहे. त्यामुळं शेतकरी खचले असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले. मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होईल या चर्चेत न अडकता विद्यमान सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं मदत जाहीर करावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. आता विदर्भात सर्वत्र पाऊस थांबलेला आहे. त्यामुळं तातडीनं पंचनामे करणं शक्य असून प्रशासनानं ती कारवाई लवकर करावी असे मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं.
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढावं
शिंदे-फडणवीस सरकारनं शेतकऱ्यांना लवकरात मदत करुन शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढावं. पुढचं पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करावी. शेतकऱ्याचं पुण्य जर पदरात पाडून घ्यायचं असेल तर तातडीनं मदत करावी असेही वडेट्टीवार म्हणाले. यासाठी युद्धपातळीवर पंचनामे करा असेही विजय वडेट्टीवार म्हणाले. बऱ्यापैकी ठिकाणी पूर ओसरला आहे. त्यामुळं पंचनामे करायला काही अडचण नसल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितलं.
आठ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्राला फटका
जून महिन्यात पावसानं हुलकावणी दिली होती. त्यानंतर मात्र, जुलै महिन्यात राज्यांच्या बहुतांश भागात पावसानं जोरदार हजेरी लावली. राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं होते. नदी नाल्यांना पूर आल्यानं शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी रत्यांचही मोठं नुकसान झालं आहे. त्याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. राज्यातील जवळपास आठ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्राला या पावसाचा फटका बसला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Hingoli banana Crop : हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीचा केळीच्या बागांना तडाखा, तत्काळ मदतीची शेतकऱ्यांची मागणी
- Maharashtra Politics : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत महत्त्वाची सुनावणी उद्याऐवजी आता 3 ऑगस्टला