Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांचं आंदोलन स्थगित, बहुतांश मागण्या मान्य; आठ दिवसांचा अल्टिमेटम
प्रशासनाने बहुतांश मागण्या मान्य केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Saghtana) नेते रविकांत तुपकरांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
Ravikant Tupkar : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Saghtana) नेते रविकांत तुपकरांनी (Ravikant Tupkar) यांच्या आंदोलनाची पीक विमा कंपनीन दखल घेतली आहे. प्रशासनाने बहुतांश मागण्या मान्य केल्याने आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय तूपकरांनी घेतला आहे. येत्या आठ दिवसात जर मागण्या मान्य झाल्या नाहीतर पुन्हा आंदोलन करणार असल्याचा इशारा तुपकरांनी दिलाय.
16 जूनला इमारतीवरुन उड्या मारण्याचा दिला होता इशारा
येत्या 15 जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात निर्णय घ्या अन्यथा, 16 जूनला मुंबईच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इमारतीवरुन उड्या मारु असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी दिला होता. यामध्ये जर शेतकर्यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल असा इशाराही तुपकरांनी दिला होता. त्यानंतर AIC पीक विमा कंपनीने बुलढाणा जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, तरीदेखील रविकांत तुपकर हे आंदोलनावर ठाम होते. मात्र, बाकीच्या मागण्या देखील प्रशासनाने मान्य करण्याचा निर्णय घेतल्यानं रविकांत तुपकरांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
विविध मागण्यांवरुन तुपकर आक्रमक
सोयाबीन आणि कापसाच्या भावासंदर्भात ठोस निर्णय घेतला नाही. अतिवृष्टीच्या नुकसानीची मदत तातडीने मिळाली नाही तसेच AIC कंपनीने उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकविम्याची रक्कम जमा केली नाही. तर आम्ही शेतकऱ्यांसह 16 जूनला मुंबईतील AIC कंपनीच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इमारतीमधील 20 व्या मजल्यावर असणाऱ्या कार्यालयावरुन खाली उड्या मारू असा इशारा तुपकरांनी दिला होता. जर शेतकर्यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल असंही तुपकरांनी म्हटलं होतं. सोयाबीन, कापूस आणि ऊसप्रश्नी रविकांत तुपकर यांनी गेल्या अनेक दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. खासगी बाजारात सोयाबीनचा भाव प्रति क्विंटल 8,500 रुपये तसेच कापसाचा भाव प्रति क्विंटल12,500 रुपये स्थिर राहावा यासाठी सरकारने धोरण आखावं, यासह इतर मागण्यांसाठी रविकांत तुपकर आक्रमक झाले आहेत. शेतकरी प्रश्ना संदर्भात रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन देखील केले होते. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांसह त्यांनी मुंबईत अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा इशारा देखील सरकारला दिला होता. त्यानंतर राज्य सरकारसोबत त्यांची बैठकही झाली होती. मात्र, मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यानं तुपकर पुन्हा आक्रमक झाले होते.
महत्त्वाच्या बातम्या: