Raghunath Dada Patil : शेतकरी संघटनेची 17 मे रोजी कोल्हापुरात ऊस परिषद, विविध ठराव मांडणार
शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही ऊस परिषद 17 मे रोजी कोल्हापुरातील दसरा चौकातील शाहू स्मारक भवनमध्ये पार पडणार आहे.
Raghunath Dada Patil : येत्या 17 मे रोजी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही ऊस परिषद कोल्हापुरातील दसरा चौकातील शाहू स्मारक भवनमध्ये पार पडणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे प्रमुख रघुनाथदादा पाटील यांनी दिली. या ऊस परिषदेमध्ये विविध ठराव केले जाणार आहेत. यामध्ये कारखाने व इथेनॉल प्रकल्पातील अंतराची अट रद्द करा ही प्रमुख मागणी असणार आहे. कारखानदारांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी ही मागणी करणार असल्याचे पाटील म्हणाले.
सध्या उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. मात्र, त्याचा फायदा शेतकऱ्यांना न होता मुठभर साखर कारखानदारांना होत असल्याचे पाटील म्हणाले. दोन साखर कारखान्यांतील व इथेनॉल प्रकल्पामधील जाचक अट रद्द करा, तुकडेबंदी कायदा रद्द करा, वीज बिल व कर्जातून शेतकऱ्यांची मुक्तता करा, गोवंश हत्याबंदी व वन्यजीव संरक्षण कायदा रद्द करा याशिवाय इतर मागण्यांसाठी रघुनाथदादा प्रणित शेतकरी संघटनेतर्फे 17 मे रोजी दुपारी 1 ते 4 या वेळेत शाहू स्मारक भवन येथे ऊस परिषद होणार आहे. शेतकऱ्यांचे हाल आजही संपत नाहीत. शासनाच्या नातेवाईकांचे कल्याण व्हावे, यासाठी दोन साखर कारखान्यांतील हवाई अंतर कमी केले जात नाही. शेतकऱ्यांना किंवा गोरगरीब लोकांना एक-दोन गुंठे जमिनीची विक्री करता येत नाही. तुकडे बंदीमुळे या सर्वसामान्य लोकांचे हाल होत आहे. यासाठी शासनाने हा कायदा रद्द केला पाहिजे असे पाटील यावेळी म्हणाले. कोल्हापूरच्या महापुरातून शेतकऱ्यांची व त्याच्या पिकांची सुटका केली पाहिजे, यासाठी कायमस्वरुपी उपाय केले पाहिजे असेही ते म्हणाले.
दरम्यान, राज्यात यंदा मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र आहे. राज्यात अनेक ठिकाणी अतिरीक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. बऱ्याच ठिकाणच्या शेतकऱ्यांचा ऊस अद्याप कारखान्याला गेला नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पश्चिम महाराष्ट्राबरोबरच मराठवाड्यातीलसुद्धा शिल्लक उसाचा प्रश्न मोठा गंभीर होत चालला आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं सर्व शेतकऱ्यांनी ऊस लागवडीला पसंती दिली. परंतू, उसाची एवढ्या मोठ्या प्रमाणात लागवड झाला की त्या उसाचं गाळप करणं अवघड झालं आहे. नुकतीच कारखान्याला ऊस न गेल्यामुळे बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने ऊस पेटवून देत आत्महत्या केली. त्यामुळे अतिरीक्त उसाचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे. या सर्वच मुद्यावर या ऊस फरिषदेत चर्चा होणार आहे.