(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sakhar Parishad : यंदा विक्रमी साखर निर्यातीची संधी, उसाचे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन; साखर परिषदेत शरद पवारांची माहिती
Sharad Pawar in Sakhar Parishad : साखर परिषदेत शरद पवारांनी म्हटलं की, यावेळेस पाणी आणि पाऊस समाधानकारक असणार आहे. त्यामुळे उसाचे उत्पादन आणखी वाढेल.
Sharad Pawar in Sakhar Parishad : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय साखर परिषदेचे उद्घाटन झालं. यावेळी शरद पवारांनी म्हटलं की, यावर्षी देशात साखरेचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात आहे. पण यात आनंद न मानता पुढील आव्हानांचा सामना करण्यासाठी तयारी करावी लागेल. तज्ञांच्या अंदाजानुसार यावर्षीपेक्षा पुढील वर्षी उसाचे लागवड क्षेत्र आणखी वाढेल. त्यामुळे उसाच्या तोडणीचे नियोजन लागवड पासून करावे लागेल, असं पवार म्हणाले. त्यांनी म्हटलं की, यावेळेस पाणी आणि पाऊस समाधानकारक असणार आहे. त्यामुळे उसाचे उत्पादन आणखी वाढेल. यावेळेस विक्रमी साखर निर्यातीला संधी आहे. यावर्षी भारतातून 121 देशात साखर निर्यात करण्यात आली. असे कधी झाले नव्हते, असं देखील पवारांनी म्हटलं आहे.
राज्यातील साखर कारखान्यांची गोडाऊन्स आणि बाधकामांवर सोलर पॅनल बसवणार?
शरद पवार म्हणाले की, अफगाणिस्तान हा साखरेचा मोठा ग्राहक आहे. मात्र तिथली परिस्थिती बदलल्याने तिथली 13 लाख टन साखरेची निर्यात तीन लाख टनावर आली. सौर उर्जेची गरज आहे. सौर उर्जेच्या क्षेत्रातील कंपन्यांनी राज्यातील साखर कारखान्यांची गोडाऊन्स आणि बाधकामांवर सोलर पॅनल बसवण्याची तयारी दर्शविली आहे. या कंपन्यांच्या मागणीवर आम्ही विचार करतो आहोत. साखर संघ, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि साखर आयुक्तालयाकडून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असं ते म्हणाले.
शरद पवारांनी म्हटलं की, आपल्या राज्यात उस वगळून इतर पिकाला हमीभाव मिळत नाही. त्यामुळेच शेतकरी उसाकडे वळतात. त्यात चुकीचे नाही. मात्र उस पिकवताना प्रती एकरी उत्पादन वाढविण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्येक कारखान्याने उस विकास योजना राबविण्याची गरज आहे, असं ते म्हणाले.
विदर्भात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची शाखा
पवार म्हणाले की, विदर्भात गोसीखुर्द धरण झालंय. हे धरण उजणी आणि कोयनेपेक्षा मोठं आहे. त्यामुळे विदर्भात उसाचे क्षेत्र वाढायला हवे. त्यासाठी विदर्भात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची शाखा सुरु करण्याची मागणी नितिन गडकरींनी केलीय. लवकरच याबाबत काम सुरु केले जाईल, असं ते म्हणाले.
या परिषदेमध्ये खासदार शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री बाळासाहेब पाटील, मंत्री शंभुराजे देसाई, मंत्री विश्वजित कदम, मंत्री सतेज पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, विजयसिंह मोहिते पाटील आणि साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर उपस्थित आहेत.