Kisan Rail : बंद झालेली किसान रेल पुन्हा सुरु करा, खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची रेल्वेमंत्र्यांकडं मागणी
सांगोला ते बिहार राज्यातील दानापूर किसान रेल्वे पुन्हा सुरू करावी, अशी मागणी माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील (MP Dhairyasheel Mohite Patil) यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केलीय.
Kisan Rail : शेतकऱ्यांना (Farmers) शेतमाल वाहतुकीसाठी सुरु केलेल्या किसान रेल (Kisan Rail) गेल्या अनेक महिन्यापासून बंद आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला ते बिहार राज्यातील दानापूर किसान रेल्वे पुन्हा सुरू करावी, अशी मागणी माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील (MP Dhairyasheel Mohite Patil) यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Minister Ashwini Vaishnaw) यांच्याकडे केली आहे. सोलापूर जिल्ह्यात गतीशक्ती मल्टी-मॉडेल कार्गो टर्मिनल (GCT) उभारावं बंयासंदर्भातही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी मोहिते पाटील यांन चर्चा केली.
शेतकऱ्यांसाठी किसान रेल्वे एक फायदेशीर, कमी वेळेत कमी खर्चात वाहतूक
माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला ते बिहार राज्यातील दानापूर किसान रेल्वे पुन्हा सुरू करण्याच्या संदर्भात आग्रही मागणी केली. कोरोना काळात केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मालवाहतुकीसाठी किसान रेल्वे सुरू केली होती. या योजनेला देशभरातील शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या रेल्वेचा वापर करून दिल्ली, कोलकाता, मुझफ्फरपूर, आणि शालिमारसारख्या मोठ्या शहरांमध्ये डाळींब, द्राक्ष, केळी, पेरू, कांदा, लिंबू, आणि इतर भाज्यांचे कमी खर्चात आणि कमी वेळेत वाहतूक केली होती. किसान रेल्वेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा मालवाहतुकीवरील खर्च 75 टक्के कमी झाला होता. रस्ते वाहतुकीसाठी प्रति किलोमीटर 7-8 रुपये खर्च येत असे, तर रेल्वेच्या माध्यमातून मालवाहतूक केल्यास हा खर्च प्रति किलोमीटर केवळ 2.50 रुपये इतका कमी झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी किसान रेल्वे एक फायदेशीर पर्याय बनला होता. या पार्श्वभूमीवर, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केंद्र सरकारकडे किसान रेल्वे पुन्हा सुरू करण्याची आणि सांगोला, पंढरपूर, कुर्डूवाडी , केम, आणि जेऊर या स्थानकांवर या रेल्वेचे थांबे देण्याची मागणी केली आहे.
सोलापूर जिल्ह्यात गतीशक्ती मल्टी-मॉडेल कार्गो टर्मिनल उभारावे
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात गतीशक्ती मल्टी-मॉडेल कार्गो टर्मिनल (GCT) उभारणीमुळे जिल्ह्याचा औद्योगिक विकास होईल, आणि रोजगार निर्मितीतही मोठी वाढ होईल. म्हणून, सोलापूर जिल्ह्यातील रेल्वे मार्गावर गतीशक्ती मल्टी-मॉडेल कार्गो टर्मिनल (GCT) उभारण्याची आपण तातडीने कारवाई करावी अशी विनंती मंत्री वैष्णव यांना मोहिते पाटील यांनी केली. सोलापूर जिल्ह्यात औद्योगिक शेत्रात वाढ करण्यासठी आणि बेरोजगारी कमी करण्यासाठी तसेच येथील वस्त्रोद्योग, विविध कृषी उत्पादने, आणि औद्योगिक वस्त्या या ठिकाणांहून उपलब्ध होणाऱ्या मालाच्या वाहतुकीसाठी गतीशक्ती मल्टी-मॉडेल कार्गो टर्मिनल (GCT) अत्यंत उपयुक्त ठरेल. या टर्मिनलमुळे, बियाणे, सिमेंट, स्टील, टाइल्स, कंटेनर, आणि इतर विविध वस्तूंची वाहतूक करता येईल. एक मालगाडी साधारणपणे 40-50 डब्यांची असते आणि याची हाताळणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता असते. या प्रक्रियेत मजूर, सुरक्षा रक्षक, क्रेन चालक, आणि कामगारांची आवश्यकता भासेल. त्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील.
वस्त्रोद्योगाला आणि कृषी उत्पादकांना चालना मिळणार
या व्यतिरिक्त, सोलापूरमधील वस्त्रोद्योगाला आणि कृषी उत्पादकांना या टर्मिनलमुळे जागतिक बाजारपेठांमध्ये स्पर्धा करण्याची संधी मिळेल. या भागातील उत्पादकांना त्यांच्या उत्पादनांची बाजारपेठेत जलद आणि प्रभावी वाहतूक करण्याचा मार्ग सुलभ होईल. ज्यामुळं निर्यातीला चालना मिळेल. तसंच, या धोरणामुळे औद्योगिक वसाहतींच्या जवळपासच्या भागात नवे आर्थिक क्षेत्र विकसित करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे मोहिते पाटील म्हणाले.