(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता कधी होणार जमा? 31 जुलैपर्यंत पूर्ण करा ई-केवायसी
PM किसान योजनेअंतर्गत आत्तापर्यंत मोदी सरकारनं शेतकऱ्यांच्या खात्यात 11 हफ्ते जमा केले आहेत. सध्या शेतकरी 12 व्या हप्त्याची वाट बघत आहेत.
PM Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Yojana) केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात दर चार महिन्यांनी 2000 रुपयांचा हप्ता हस्तांतरित केला जातो. आत्तापर्यंत मोदी सरकारनं शेतकऱ्यांच्या खात्यात 11 हफ्ते जमा केले आहेत. सध्या शेतकरी 12 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. दरम्यान, त्यापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली नाही. त्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण करावी असे सरकारच्या वतीनं सागंण्यात आलं आहे. ई-केवायसी करण्याची मुदत वाढवली असून, ती 31 जुलै 2022 पर्यंत करण्यात आली आहे.
बाराव्या हप्त्याचे पैसे कधी येणार?
पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी जमा होणार याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 1 एप्रिल ते 31 जुलै या कालावधीसाठी पहिल्या हप्त्याची रक्कम दिली जाते. त्याचवेळी, दुसऱ्या हप्त्याचे पैसे 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान हस्तांतरित केले जातात. याशिवाय तिसऱ्या हप्त्याचे पैसे 1 डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत ट्रान्सफर केले जातात. यावेळी, पीएम किसान योजनेच्या 11व्या हप्त्याचे पैसे 31 मे 2022 रोजी हस्तांतरित केले आहेत. आता अशी माहिती मिळत आहे की 12 व्या हप्त्याचे पैसे हे 1 सप्टेंबर 2022 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातील.
31 जुलै 2022 पूर्वी ई-केवायसी करा
अनेक अपात्र लोक या सरकारी योजनेचा लाभ घेत होते. त्यामुळं सरकारने सर्वांसाठी ई-केवायसी अनिवार्य केली आहे. जर तुम्ही आत्तापर्यंत KYC केली पूर्ण केली नसेल तर तुमच्या खात्यात 12 व्या हप्त्याचे पैसे येणार नाहीत. ई-केवायसी शिवाय तुमचा 12 वा हप्ता अडकेल. यासाठी तुम्ही 31 जुलै 2022 पूर्वी ई-केवायसी करुन घेणं आवश्यक आहे. तुम्ही ऑनलाइन केवायसी प्रक्रिया घरी बसून पूर्ण करु शकता.
पीएम किसान योजनेअंतर्गत, तुम्हाला तुमच्या रेशन कार्डची पीडीएफ प्रत पोर्टलवर (PM Kisan Portal) अपलोड करावी लागेल. यासोबतच आधार कार्ड, बँक पासबुक आदींच्या हार्ड कॉपी जमा करण्याची अटही काढून टाकण्यात आली आहे. यानंतर तुम्हाला फक्त रेशन कार्ड अपलोड आणि ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल.