Nagpur News : डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावानं आंतरराष्ट्रीय दर्जाचं कृषी संमेलन केंद्र स्थापन होणार, नितीन गडकरींची घोषणा
डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावानं आंतरराष्ट्रीय दर्जाचं कृषी संमेलन केंद्र स्थापन होणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली.
Nagpur News : देशाचे पहिले कृषीमंत्री दिवंगत डॉ. पंजाबराव देशमुख (Dr. Panjabrao Deshmukh) यांच्या नावाने पश्चिम नागपुरातील (Nagpur) दाभा येथील कृषी विद्यापीठाच्या मैदानात आंतरराष्ट्रीय दर्जाचे कृषी संमेलन केंद्र स्थापन होणार आहे. यासाठी 150 कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिली. विदर्भातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचे गडकरी म्हणाले.
विदर्भातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातीलनवीन तंत्रज्ञानाची, जोडधंद्याची माहिती व्हावी. तसेच त्याचा उपयोग त्यांच्या उत्पन्न वाढीसाठी व्हावा. त्यांची शेती लाभदायक व्हावी या हेतून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 13 व्या ऍग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ- पीडीकेव्हीच्या दाभा मैदानावर झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान उपस्थित होते.
सेंद्रिय उत्पादनांसाठी स्वतंत्र मॉल स्थापन करणार
वर्धा रोडवर 4 हजार 400 चौरस फूट जागेवर अॅग्रो व्हिजनचे कार्यालय आणि प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येईल. यासोबतच शेजारी असलेल्या सार्वजनिक वापराच्या जागेवर सेंद्रिय उत्पादनांसाठी स्वतंत्र मॉल वजा बाजार स्थापन करण्यात येणार असल्याचे नितीन गडकरी म्हणाले. तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी अॅग्रो व्हिजन हे शेतकऱ्यांचे राहणीमान बदलण्याचे तंत्र असल्याचे सांगितले. मध्य प्रदेश शासनाने शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ केली आहे. खर्चात कपात केली, शेतकऱ्यांना थेट लाभ मिळवून दिला, आधुनिक शेतीवर भर दिला आणि नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना मदत केल्याचे चौहान म्हणाले. त्यामुळं यावर्षी 18 टक्के कृषी विकास दर गाठणे सरकारला शक्य झाल्याचे शिवराजसिंग चौहान म्हणाले.
25 ते 28 नोव्हेंबरपर्यंत कृषी प्रदर्शन, विविध विषयांवर कार्यशाळांचं आयोजन
25 ते 28 नोव्हेंबर दरम्यान नागपुरात ऍग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनाचे आयोजन केलं आहे. यामध्ये ऊस शेती , विदर्भात मत्स्य व्यवसायाचा विकास, बांबू उत्पादनातून संधी, विदर्भाचा दुग्ध विकास या मुख्यपरिषदांसह विविध विषयांवर विस्तृत कार्यशाळा होणार आहेत. या प्रसंगी आयोजित कृषीप्रदर्शनात विविध कृषी निविष्ठाची दालन, कृषी अवजार, पतपुरवठा संस्था,बँक , कृषी संशोधन संस्था यांची दालन आहेत. यंदाच्या अॅग्रोव्हिजनची संकल्पना 'अन्न, चारा आणि इंधन' - भविष्यातील शेती' अशी आहे. या कृषी प्रदर्शनात सुमारे 450 दालन असून बायो सीएनजी वर चालणारा ट्रॅक्टर देखील येथे आहे.
महत्त्वाच्या बातम्या: