Narendra Singh Tomar : कृषी पायाभूत सुविधा निधीच्या माध्यमातून शेती मजबूत आणि समृद्ध व्हावी : कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर
शेती समृध्द करण्यासाठी राज्यांना कृषी पायाभूत सुविधा निधी चांगली संधी देणार असल्याचे मत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी व्यक्त केले.
Narendra Singh Tomar : शेती समृध्द करण्यासाठी राज्यांना कृषी पायाभूत सुविधा निधी चांगली संधी देणार असल्याचे मत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी व्यक्त केले. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी राज्ये आणि बँकांनी एकत्रितपणे या रकमेचा उपयोग करायला हवा. यामाध्यमातून शेती मजबूत आणि समृद्ध करण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं असल्याचे तोमर म्हणाले. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते नवी दिल्लीत कृषी पायाभूत सुविधा पुरस्कारांचे वितरण करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.
कृषी पायाभूत सुविधांची उणीव भरुन काढण्यात एआयएफची भूमिका महत्त्वाची
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत सुरु केलेला कृषी पायाभूत सुविधा निधी (एआयएफ) नवीन टप्पे गाठत असल्याचे नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले. खेड्यांचे सबलीकरण करुन आणि खासगी गुंतवणुकीला चालना देऊन कृषी पायाभूत सुविधांची उणीव भरुन काढण्यात एआयएफची भूमिका कृषीमंत्र्यांनी अधोरेखित केली. कृषी उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी, कृषी निर्यात वाढवण्यासाठी, कृषी क्षेत्राला रोजगारक्षम बनवण्यासाठी आणि नवीन पिढीला कृषी क्षेत्राकडे आकर्षित करण्यासाठी कृषी पायाभूत सुविधा निधीची योजना करण्यात आली असल्याचे तोमर म्हणाले.
कृषी आणि संलग्न क्षेत्रामध्ये 1.5 कोटी रुपयांहून जास्त गुंतवणूक
आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत कृषी आणि संलग्न क्षेत्रामध्ये 1.5 कोटी रुपयांहून जास्त गुंतवणूक करण्यात आली आहे. कृषी क्षेत्राच्या विकासाकरता राज्ये आणि बँकांनी एकत्रितपणे या रकमेचा उपयोग करायला हवा. राज्यांना कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या पतपुरवठयातील कमी भरुन काढण्याची ही उत्तम संधी आहे. राज्य सरकारांनी त्याचा उपयोग शेती मजबूत आणि समृद्ध करण्यासाठी केला पाहिजे, ज्यामुळं देशाचा विकास वेगाने होईल, असेही तोमर म्हणाले. तुम्हाला जर या क्षेत्रात पुढे जायचे असेल, तर आव्हाने ओळखून त्यावर मात करावी लागेल.
कृषी क्षेत्राच्या उन्नतीसाठी सरकारचे सातत्त्यानं प्रयत्न
देशात 86 टक्के छोटे शेतकरी आहेत. ज्यांच्याकडे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे, तर देशाची 55 ते 60 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेली आठ वर्ष कृषी क्षेत्राच्या उन्नतीसाठी सातत्त्याने प्रयत्न केले जात असल्याचं तोमर यांनी सांगितलं. तोमर यांनी या कार्यक्रमात कृषी पायाभूत सुविधा निधी या केंद्रीय क्षेत्र योजने अंतर्गत अर्थपुरवठा करण्यात मोलाचे योगदान दिल्याबद्दल बँका आणि राज्य सरकारांचा गौरव करण्यासाठी विविध श्रेणींतील पुरस्कार प्रदान केले.
महत्त्वाच्या बातम्या: