Monsoon News: मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आजपासून पावसाची शक्यता
पेरणीपूर्व मशागती जवळपास पूर्ण झाल्या असून, शेतकऱ्यांचे डोळे पाण्याकडे लागले आहेत.
Monsoon News: मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून, आजपासून विभागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पावसाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. तर कालच मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. याबाबतची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. मान्सून काही काळ श्रीलंकेच्या वेशीवर अडकला होता मात्र, अखेर तो रविवारी केरळमध्ये दाखल झाला आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मराठवाड्यात 30 ते 01 जूनदरम्यान वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. 30 मे रोजी नांदेड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली तर 31 मे व एक जूनला नांदेड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, बीड जिल्ह्यांच्या काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, अशी माहिती ग्रामीण कृषी मौसम विभागाचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. कैलास डाखोरे यांनी दिली.
शेतकरी लागले कामाला...
जून महिना लागण्यापूर्वीच पेरणीपूर्व मशागतीसाठी शेतकरी कामाला लागतात. यावर्षी सुद्धा असेच काही चित्र पाहायला मिळत आहे. तर खरीप हंगामासाठी लागणारे खत, बी-बीयाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. त्यामुळे मान्सूनच्या पावसाची वाट शेतकरी पाहत असून, त्यांनतरच पेरणीला सुरवात होईल.
पुढच्या सात दिवसात महाराष्ट्राचा मान्सूनचे आगमन
सर्वांसाठी दिलासा देणारी बातमी मिळाली आहे. अखेर मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. यावर्षी वेळेआधीचं मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळं देशातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. आज केरळमध्ये दाखल झालेला मान्सून पुढच्या सात दिवसात तळकोकणात दाखल होत असतो. यंदाही 4 ते 5 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर तो मुंबई, पुणे अन्य ठिकाणी पाऊस बरसणार आहे. जूनमधील मान्सूनचा प्रवास पहिल्या दोन आठवड्यात मंदावलेला असेल, त्यानंतर तो सर्वत्र बरसेल अशी स्थिती दिसत आहे. सध्या राज्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसानं चांगलेची हजेरी लावल्याचे दिलसत आहे. कोकणात काही ठिकाणी पाऊस झाला आहे. तसेच मुंबईच्या परिसरात देखील हलका पाऊस झाला आहे.