राज्यात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा अंदाज, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पुन्हा गारपिटीची शक्यता
विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 13 आणि 15 एप्रिलला काही ठिकाणी गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Maharashtra Weather Update: राज्यात पुन्हा पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलाय. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पुन्हा गारपिटीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 13 आणि 15 एप्रिलला काही ठिकाणी गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
महाराष्ट्रात पुढील ५ दिवस अवकाळी पाऊस, भारतीय हवामान विभागाचा अंदाज
— Abhishek Muthal अभिषेक मुठाळ (@abhishekmuthal) April 10, 2023
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील ५ दिवस अवकाळीचा अंदाज
विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पुन्हा गारपिटीची शक्यता
विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज, कुठेही गारपिटीची शक्यता नाही @abpmajhatv pic.twitter.com/iJetY3mG0q
राज्यात विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील काही भागात आगामी पाच दिवस अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात तिसऱ्यांदा अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे शेतकऱ्यांची अवस्था आगीतून फुफाट्यात अशी झाली आहे. अवकाळी पावसामुळे वर्षभर मेहनतीनं पिकवलेलं सोन्यासारखं पिकं मोतीमोल झालंय.. शेतमालाचं झालेलं प्रचंड नुकसान पाहून बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे.
नाशिक जिल्ह्यात आठ हजार हेक्टर शेतीचं नुकसान
गारपीट आणि अवकाळी पावसामुळे राज्यात 34 हजार हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी ही माहिती दिली. प्रत्यक्ष पंचनामा झाल्यानंतर अचूक आकडेवारी समोर येतील, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळेल, असंही ते म्हणाले. कृषी आयुक्त चव्हाण हे स्वतः नुकसानीची पाहणी करण्यासाठी बांधावर गेले. नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात त्यांनी नुकसानीचा आढावा घेतला आहे. दरम्यान, अवकाळीमुळे सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्ह्यात झालं आहे. नाशिक जिल्ह्यात आठ हजार हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. त्याखालोखाल नगर जिल्ह्यात 7 हजार 305 हेक्टरवरील मका, कांदा, वाटाणा, कलिंगड ,आंबा ,झेंडू आणि इतर पिकांचं नुकसान झाले आहे.
फळबागांचे मोठे नुकसान
अवकाळी पावसाचा मोठा फटका राज्यातील शेती पिकांना बसला आहे. यामध्ये फळबागांचे मोठे नुकसान झालं आहे. द्राक्ष, आंबा, केळी संत्रा, काजू या बागांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. तसेच कलिंगड, गहू, कांदा, हरभरा, या पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर, गहू, ज्वारी यासह आंब्याचा मोहर पूर्णपणे गळून गेला असून, नव्यानं लागवड केलेल्या भाजीपाल्याचं देखील प्रचंड नुकसान झालं आहे.
























