Maharashtra Rains : राज्यात पावसाचा जोर कमी, अतिवृष्टीमुळं आत्तापर्यंत राज्यात 112 जणांचा मृत्यू
Maharashtra Rains : सध्या राज्यात पावसानं विश्रांती घेतली आहे. राज्यातील सातारा, सांगली आणि वर्धा जिल्ह्यातील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.
Maharashtra Rains : सध्या राज्यात पावसानं (Rain) विश्रांती घेतली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या शेती कामांना वेग आला आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे. तर काही ठिकाणी मात्र, अतिवृष्टी झाली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. तसेत दुसरीकडे अनेक नदी नाल्यांना पूर आल्यानं जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहे. विशेषत: मराठवाडा (marathwada ) आणि विदर्भाला (Vidarbha) या अतिवृष्टीचा खूप मोठा फटका बसला आहे. दरम्यान, सांगली, सातारा आणि वर्धा जिल्ह्याच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसानं हजेरी लावली.
तीन ऑगस्टपर्यंत पावसाचा अंदाज
दरम्यान, राज्यातील अनेक भागात पाऊस पडण्याचा अंदाज देण्यात आला आहे. यामध्ये ठाणे, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सातारा या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मुंबईतही हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान, राज्यात तीन ऑगस्टपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मान्सूनमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी पुणे, दिल्लीपेक्षा चांगली झाली आहे.
राज्यात आत्तापर्यंत अतिवृष्टीमुळं 112 जणांचा मृत्यू
राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला होता. या मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं होतं. काही ठिकाणी नदी नाल्यांना पूर आलेहोते. विशेषत: मराठवाडा (Marathwada )आणि विदर्भाला (vidarbha) या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान, राज्यात आत्तापर्यंत अतिवृष्टी, पूर आणि वीज पडल्याच्या घटनांमुळं 112 जणांचा मृत्यू झाला आहे.
तर या पावसामुळं शेतीच्या पिकांचेही मोठं नुकसान झालं आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरवडून गेल्या आहेत.
कोकणातही पावसाची उघडीप
कोकणातील शेतकऱ्यांना अद्यापही पावसाची गरज आहे. मात्र, गेल्या आठवडाभरापासून कोकणात पावसानं विश्रांती घेतली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या पाच तालुक्यात गेल्या दहा दिवसात शून्य टक्के पावसाची नोंद झाली आहे. दहा दिवसापासून जिल्ह्यात पावसानं दडी मारली आहे. त्यामुळं शेतकरी पावसाची वाट भगत आहेत. कारण पिक चांगलं येण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांना अद्यापही पावसाची गरज आहे.
जुलै महिन्यात राज्यात चांगला पाऊस
जून महिन्यात पावसानं हुलकावणी दिली होती. त्यानंतर मात्र, जुलै महिन्यात राज्यांच्या बहुतांश भागात पावसानं जोरदार हजेरी लावली. राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्यानं जनजीवन विस्कलीत झालं होते. नदी नाल्यांना पूर आल्यानं शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी रत्यांचही मोठं नुकसान झालं आहे. त्याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. राज्यातील जवळपास आठ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्राला या पावसाचा फटका बसला आहे. सध्या विविध ठिकाणी पंचनामे सुरु असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली आहे.