Maharashtra Rain : मराठवाड्यासह विदर्भ आणि कोकणात पावसाची हजेरी, काही ठिकाणी शेती पिकांना मोठा फटका
Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात पावसानं धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज्यातील विविध भागातील हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत: विदर्भात पावसानं धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. उभी पिकं पाण्यात असल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे.
सध्या मुंबईसह, ठाणे, पालघर कोकण, मराठवाड्यातील काही जिल्हे, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांमध्ये नद्यांना पूर आला आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरलं आहे. या पाण्यामुळं शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे.
यवतमाळमध्ये मुसळधार, शेती पिकांचं मोठं नुकसान
यवतमाळ जिल्ह्यातही पावसानं धुमाकूळ घातला आहे. वणी तालुक्यातील 84 नागरिकांना बोटीद्वारे सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. वणी तालुक्यातील भुरकी, जुनाड, कवडशी, सावनगी, शिवणी, चिंचोली, जुगाद या गावांना पाण्याचा वेढा आहे. घरात पाणी शिरलं आहे. जिल्ह्याच्या दोन दिवसात कोसळलेल्या पावसामुळे राळेगाव तालुक्यातून वाहणाऱ्या रामगंगा नदीला पूर आला आहे. या पुरामुळं झाडगाव परिसरातील शेकडो एकर जमीन खरडून गेली आहे. राळेगाव तालुक्यात मोठी विदारक स्थिती निर्माण झाली आहे. पाण्याचा वेग येवढा होता शेतातील माती पूर्णपणे वाहून गेली असून केवळ मोठ मोठे दगड शेतात राहिले आहेत. इतकेच नव्हेतर या पुराच्या पाण्याने मोठे दगडही शेतात येऊन पडले. शेतातील कपाशी, सोयाबीन, तूर हे उभ पीक आणि माती पूर्ण पाने वाहून गेली. त्यामुळे शेतकरी पुरता खचून गेला आहे.
रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यातही सध्या धो धो पाऊस कोसळताना दिसत आहे. चिपळूणमध्ये चांगला पाऊस पडत आहे. या पावसामुळं गतवर्षी अतिवृष्टीमुळे चिपळूणला महापूराचा फटका बसला. त्यात सार चिपळूण उद्ध्वस्त झालं होतं. या महापुरातील आठवणी आजही कायम आहेत.
वर्धा
वर्धा जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळं तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. प्रसिद्ध आजनसरा देवस्थानाला पुराचा मोठा फटका बसला आहे. मंदिरात पाणी शिरल्यानं मंदिर प्रशासनाकडून परिस्थिती पूर्ववत करण्याचं कार्य सुरु आहे. कार्यालयातील इलेक्ट्रिक वस्तू प्लायवूड आणि इतर वस्तू भिजल्यानं मोठं नुकसान झालं आहे. तसेच हिंगणघाट तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या आजनसरा येथील संत भोजाजी महाराज देवस्थानात मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरल्यामुळे मंदिराचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. कार्यालयातील कॉम्प्युटर, इलेक्ट्रिक सामान, सीसीटीव्ही मशीन, प्लायवूड यासह अनेक वस्तूंचे नुकसान झाल्यामुळे आता देवस्थानातील कर्मचाऱ्यांकडून मंदिराची साफसफाई केली जात आहे.मंदिराच्या मागे वर्धा आणि यशोदा नदीचा संगम आहे. त्यामुळे यावर्षी मुसळधार पाऊस बरसल्यामुळं नद्यांना पूर आला आणि पुराचे पाणी हे थेट मंदिर परिसरात शिरलं आहे. यामुळं परिसराचंही आणि मंदिराच्या कार्यालयाचं देखील मोठं नुकसान झालं आहे.
अकोला
अकोला जिल्ह्यात संततधार पाऊस बरसल्याने हैद्राबाद आणि माध्यप्रदेशला जोडणारा अकोला-अकोट महामार्ग पूर्णा नदीवरील गांधीग्रामच्या पुलावरुन पाणी जात असल्याने 24 तासंपासून बंद पडला होता. मात्र आता पूर ओसारल्याने वाहतूक पूर्वपदावर आली आहे.
चंद्रपूर
चंद्रपूर शहरातील सिस्टर कॉलनी, रहेमतनगर सारख्या इरई नदी काठच्या भागात पुन्हा पुराचे पाणी शिरले आहे. गेल्या आठवड्यात पूर आल्यानंतर नुकतीच नागरिकांनी घरांची स्वच्छता केली होती. पाऊस नसताना वर्धा नदी आणि तिच्या उपनद्यांना पूर आला आहे. वर्धा-यवतमाळ जिल्ह्यातील धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्यानं वर्धा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे.
बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यातही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्णा नदीला पूर आल्यामुळं लगतच्या छोट्या नदी पात्रात पुराचं बॅक वॉटर घुसल्यानं पूर्णा नदी काठच्या गावांना पूर परिस्थिचा सामना करावा लागत आहे. मलकापूर तालुक्यातील काळेगाव येथील विश्वगंगा नदीला आलेल्या पूर्णा नदीच्या पाण्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून काळेगाव चा संपर्क तुटला आहे.
मराठवाड्यातही मोठं नुकसान
गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसाचा फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांनाही बसला आहे. विभागातील जवळपास 3 लाख 38 हजार 88 हेक्टरचे नुकसान झाले असून, याचा 3 लाख 51 हजार 499 शेतकऱ्यांना फटका बसला आहे. ज्यात सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात झाले आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनाने सुरु केली आहेत.