(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Monsoon : राज्यात काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी प्रतीक्षा, खरीपाच्या पेरणीला सुरुवात होणार
राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस होताना दिसत आहे. मात्र, काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतिक्षा कायम आहे. 18 जूनपासून पावसाचा वेग वाढणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
Maharashtra Monsoon : राज्यात मान्सूनचं आगमन झालं आहे. मान्सून हळूहळू पुढे सरकत आहे. राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस होताना दिसत आहे. मात्र, काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतिक्षा कायम आहे. अद्यापही काही ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला नाही. दरम्यान, निम्म्या महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झालं आहे. मुंबई आणि परिसरात चांगलाच पाऊस झाला. तसेच राज्याच्या इतरही भागात पावसानं दरदार हजेरी लावली आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, पालघरसह पुणे, सांगली, वाशिम, यवतमाळ, सिंधुदुर्ग, बुलढाणा या जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं लवकरच खरीपाच्या पेरणीला सुरुवात होणार आहे.
18 जूनपासून पावसाचा वेग वाढणार
दरम्यान, सक्रिय मान्सूनची स्थिती पाहता, 18 जून 2022 पासून कोकण आणि लगतच्या घाट भागात पावसाचा वेग हळूहळू वाढण्याची अपेक्षा आहे. या कालावधीत प्रदेशात वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति अतिवृष्टीसह व्यापक पर्जन्यवृष्टी अपेक्षित असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
राज्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच हेजरी लावली आहे. या पवासामुळं शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या पावसामुळं पेरणीपूर्व कामांना वेग आला आहे. राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत होते. अखेर पावसाचं आगमन झाल्यानं शेतकरी आनंदी आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांनी नेमकी पेरणी कधी करावी असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर कृषी विद्यापीठ आणि कृषी तज्ज्ञांनाकडून याबाबत सल्ला मिळाला आहे. 100 मिलीमीटर पाऊस पडेपर्यंत शेतकऱ्यांना पेरणीची घाई करु नये असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. दुबार पेरणीची अडचण टाळण्यासाठी कृषी तज्ज्ञांनी हा सल्ला दिला आहे.
वाशिम जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी
वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात रात्री 3 वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यात रिसोड, मंगरुळपीर, मालेगाव, मानोरा, तालुक्यात जरी पाऊस जास्त बरसला असला तरी मात्र कारंजा ,वाशिम ,तालुक्यात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. त्यात कारंजा तालुक्यात पाऊस पडल्यानं आता शेतीच्या कामांना वेग येणार आहे.
बुलढाण्यातही चांगला पाऊस, खरिपाच्या पेरणीला होणार सुरुवात
रात्री 2 वाजल्यापासून बुलढाण्यात चांगलाच पाऊस सुरु झाला आहे. जिल्ह्यातील नांदुरा, खामगाव, शेगाव तालुक्यात जोरदार पाऊस झाला तर जळगाव जामोद, मलकापूर तालुक्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. पावसानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वतावरण निर्माण झालं आहे. आज पासून खरिपाच्या पेरणीला होणार सुरुवात होणार आहे.
बेळगाव जिल्ह्यातही मुसळधार
बेळगाव जिल्ह्यातील सौदत्ती येथील परिसरात मुसळधार पावसानं हजेरी लावली. सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. श्री यल्लमा देवीच्या दर्शनाला आलेल्या भक्तांची तारांबळ उडाली.