White Onion : अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला जीआय मानांकन, वाचा काय होणार फायदा?
अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला (Alibag White Onion) जीआय मानांकन प्राप्त झालं आहे.
White Onion : अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला (Alibag White Onion) भौगोलिक मानांकन (Geographical Indication) मिळाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पांढऱ्या कांद्याला जीआय मिळावे यासाठी प्रयत्न सुरु होते. याबाबतची माहिती केंद्र सरकारकडून (Central Govt) देण्यात आली आहे. पांढऱ्या कांद्याचे विविध गुणधर्म आहेत. त्यामुळं बाजारात देखील पांढऱ्या कांद्याला मोठी मागणी असते. जीआय टॅग मिळाल्याचा फायदा शेतकऱ्यांना (Farmers) होणार आहे.
पांढऱ्या कांद्याचे विविध गुणधर्म आहेत. पांढरा कांदा हा ह्रद्यविकार, कोलेस्ट्रेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर असतो. त्यामुळं सातत्यानं या कांद्याला मागणी असते. अलिबागच्या या पांढऱ्या कांद्याला आता जीआय मानांकन मिळाल्यानं त्याची प्रतिष्ठा वाढली आहे. कृषी विभागासह कोकण कृषी विद्यापीठ आणि ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सी यांच्या प्रयत्नाने 2019 मध्ये ला पांढऱ्या कांद्याच्या जीआय मानांकनासाठी नोंदणी करण्यात आली होती. अखेर या कांद्याला जीआय मानांकन मिळालं आहे.
कुठे केली जाते पांढऱ्या कांद्याची लागवड
अलिबाग तालुक्यातील अनेक ठिकाणी पांढऱ्या कांद्याची लागवड केली जाते. तालुक्यातील नेऊली, खंडाळे, कार्ले, वाडगाव अशा विविध गावांमध्ये पांढर्या कांद्याची लागवड करण्यात आली आहे. हा कांदा उन्हाळ्यातील दोन ते तीन महिनेच बाजारात विक्रीसाठी असतो. साधारणपणे फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला हा कांदा बाजारात दाखल होण्यास सुरुवात होते. अलिबाग परिसरातील शेतकरी भातशेती नंतरचे दुबार पीक म्हणून पांढऱ्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात लागवड करत असतात. आता या कांद्याला जीआय टॅग मिळाल्यानं देशासह जागतिक बाजारपेठेमध्ये स्थान मिळवणं शेतकर्यांना शक्य होणार आहे. याचा मोठा फायदा पांढऱ्या कांद्याचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना होणार आहे.
जीआय मानांकन मिळाल्यामुळं काय फायदे होतात
आपल्या शेतीमालास प्रतिष्ठा मिळते.
शेतीमालाची नेमकी ओळख निर्माण होते.
शेतमालाची गुणवत्तेची खात्री होते
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत शेतमालाला स्थान मिळते
अलिबागचा पांढरा कांदा वैशिष्ट्यपूर्ण
अलिबागचा पांढरा कांदा वैशिष्ट्यपूर्ण समजला जातो. चवीला अन्य कांद्यापेक्षा गोड, टिकाऊ अशी त्याचे वैशिष्ट्ये आहेत. महिलांकडून कुशलतेने या कांद्याची माळ किंवा वेणी केली जाते व ती प्रसिद्ध आहे. अलिबाग भागातील हे पारंपरिक बियाणे आहे. भातकाढणी झाल्यानंतर दोन महिन्यांच्या कालावधीत ओलाव्याच्या आधारे हा कांदा लावण्यात येतो.
पांढऱ्या कांद्याचे फायदे काय?
पांढऱ्या कांद्यामध्ये अँथोसायनिन आणि क्वेर्सेटिन नावाचे अँटी-ऑक्सिडंट असतात, जे कॅन्सरपासून बचाव करतात. त्याचवेळी, कांद्याच्या पातीमध्ये सल्फर आणि फ्लेव्होनॉइड अँटी-ऑक्सिडंट आढळतात जे कर्करोगाशी लढण्यास मदत करतात. पांढऱ्या कांद्याचा रस आणि मध एकत्र प्यायल्याने कफ सिरपचे काम होते. छातीवर लावल्याने श्वसनाचे आजार बरे होतात. पांढऱ्या कांद्याचा समावेश अल्कधर्मी अन्नामध्ये होतो जो शरीरातील आम्ल संतुलित करण्याचे काम करतो. गॅसच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी याचे सेवन अवश्य करावे. पांढऱ्या कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी, लोह, कॅल्शियम आणि अनेक आवश्यक घटक आढळतात. हे अँटीऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहे.
महत्त्वाच्या बातम्या: