(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Rain : पुढील तीन ते चार दिवसात कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
मुंबईसह उपनगरात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. या पावसामुळं मुंबईकरांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. तर दुसीरकडं गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातही पावसानं चांगलीच हजेरी लावली.
Maharashtra Rain : सध्या राज्यात काही भागात पावसानं दडी मारली आहे. तर काही भागात चांगला पाऊस झाला आहे. मुंबईसह उपनगर आणि ठाणे परिसरात रात्ररभर पावसानं हजेरी लावली. त्यामुळं मुंबईकरांना उष्णेतापासून दिलासा मिळाला आहे. तसेच गडचिरोलीतही 15 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर चांगला पाऊस झाला. त्याचबरोबर चंद्रपूरमध्ये देखील समाधानकारख पाऊस झाला. या ठिकाणी पडलेल्या पावसामुळं शेतकरी आनंदी आहेत. तर दुसरीकडे अद्यापही पावसानं दडी मारली आहे. तेथील शेतकरी पेरणीसाठी पावसाची वाट बघत आहेत. दरम्यान, पुढील तीन ते चार दिवसांमध्ये दक्षिण कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातही प्रामुख्यानं घाट विभागांमध्ये काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज आहे.
गडचिरोली 15 दिवसानंतर पावसाची हजेरी
तब्बल 15 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर गडचिरोलीत चांगला पाऊस झाला. याआधी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पाऊस समाधानकारक पाऊस पडला होता. या पावसाच्या आगमनानं उष्ण हवामानापासून नागरिकांना मिळाला दिलासा मिळाला आहे. अचानक बरसलेल्या पावसानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. समाधानकारक पाऊस नसल्यानं जिल्ह्यातील पेरण्या आहेत होत्या. दरम्यान पेरणीसाठी आणखी दमदार पावसाची गरज आहे.
पेरणीसाठी दमदार पावसाची गरज
दहा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर चंद्रपुरात पाऊस पडला आहे. याआधी 20 जून रोजी पाऊस पडला होता. या पावसामुळं उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. अचानक बरसलेल्या पावसाने शहरातील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. समाधानकारक पाऊस नसल्यानं जिल्ह्यातील पेरण्या आहेत खोळंबल्या आहेत. केवळ 5 टक्केच पाऊस झाल्यानं बळीराजाला पेरणीसाठी दमदार पावसाची गरज आहे.
दरम्यान, पुढील तीन ते चार दिवसांमध्ये दक्षिण कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं येत्या 3 ते 4 दिवसांत कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्या परिस्थितीत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यातल्या घाटमाथ्यावर उद्या आणि परवा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.