Shivneri Alphonso : जुन्नरमधील आंब्याला शिवनेरी हापूस म्हणून भौगोलिक मानांकन घेण्यासाठी सरकारचे प्रयत्न
शिवनेरी हापूसला भौगोलिक मानंकर मिळाल्यास इथल्या आंब्याच्या लागवडीचे क्षेत्र वाढून शेतकऱ्यांना फायदा होणारअनेक ऐतिहासिक ठिकाणांबरोबरच इथला शिवनेरी हापूस देखील पर्यटकांच्या आकर्षणाच केंद्र ठरणार
पुणे : जुन्नर भागातील हापूस आंबा चव, रंग, वास, रंग या सर्वच बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण आहे. पुराणकाळातील ग्रंथांपासून ते मध्ययुगीन आणि शिवकालीन ग्रंथांमधेही इथल्या आंब्याचे उल्लेख आहेत. याचाच आधार घेऊन इथल्या आंब्याला शिवनेरी हापूस म्हणून भौगोलिक मानांकन घेण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु झाले आहेत. शास्त्रज्ञांची टीम त्यासाठी काम करत आहे. हे भौगोलिक मानांकन प्राप्त झाल्यावर जुन्नरच्या पर्यटनात भर पडणार आहे.
छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरी, ख्रिस्तपूर्व काळात सातवाहन साम्राज्याचा युरोपमधील रोमन साम्राज्यासोबत जिथून व्यापार चालायचा तो नानेघाट आणि निजामशाही आणि मुघल साम्राज्याच्या खाणाखुणा अंगावर वागवणारे भव्य महाल अशा बर्याच गोष्टी जुन्नर परिसराला वैशिष्ट्यपूर्ण बनवतात. आता यामध्ये इथल्या हापूस आंब्याची भर पडणार आहे. या जुन्नर आणि आंबेगाव परिसरात येणारा हापूस आंबा इतर ठिकाणी पिकणाऱ्या हापूस आंब्यापेक्षा निराळा आणि वैशिष्ट्यपूर्ण असल्याने त्याचे भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरु झाले आहेत. भौगोलिक मानांकनाची ही प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी नारायणगावच्या कृषी विज्ञान केंद्रावर सोपवण्यात आली असून त्यासाठी तीस लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
हापूस म्हटलं की महाराष्ट्रात रत्नागिरी आणि देवगड परिसरातील आंबा असं मानलं जातं. मात्र जुन्नर परिसरातील आंबा कोकणातील आंब्यापेक्षा वेगळा असल्याचं आणि तरीही तो हापूस याच जातकुळीतील असल्याचं शास्त्रीय तपासण्यांमधे सिद्ध झालं आहे. आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूटकडून करण्यात आलेल्या संशोधनात शिवनेरी हापूसचे डीएनए प्रोफायलिंग हे रत्नागिरी आणि देवगड हापूसपेक्षा वेगळं असल्याचं आढळून आलं आहे.
त्याचबरोबर
* प्रोटिन्स, कार्बोहायड्रेट्स, साखरेचे प्रमाण, कॅल्शियम आणि पोटॅशियमचे प्रमाण या सर्वच बाबतीत कोकण हापूस आणि शिवनेरी हापूसमध्ये फरक आहे.
*कोकणातील लाल माती आणि समुद्रावरुन येणारे खारे वारे यांचा परिणाम तिथल्या हापूसच्या चवीवर होतो तर जुन्नर भागातील कोरडी हवा, काळी माती आणि कोकणच्या तुलनेत पावसाचे कमी प्रमाण याचा परिणाम इथल्या हापूसवर होतो.
जुन्नर भागाला संपन्न ऐतिहासिक वारसा लाभला आहे. सातवाहनकालीन गाथासप्तशती या ग्रंथात इथल्या आंब्याचा उल्लेख आहे. निजामशाहीचा वजीर मलिक अंबर याच्या इथल्या महलाला हापूस बाग म्हणून आजही ओळखलं जातं तर मोगलकालीन कागदपत्रांमधेही इथल्या हापूसचा उल्लेख आहे. सेतुमाधवराव पगडी आणि रियासतकार देसाई यांनी संपादित केलेल्या ग्रंथांमधे इथल्या आंब्याचे सविस्तर वर्णन पहायला मिळते. या सगळ्याचा उपयोग इथल्या आंब्याला भौगोलिक मानांकन प्राप्त करुन घेण्यासाठी करुन घेतला जात आहे.
हापूस या नावाबाबत इथे काही दंतकथाही प्रचलित आहेत. शहाजी महाराजांसोबत एकाच वेळी मुघल आणि आदिलशाहीशी टक्कर घेणारा मलिक अंबर हा आफ्रिकेतील ॲबसेनीया देशातून गुलाम म्हणून भारतात आला होता. त्या भागातील लोकांना त्या काळी हबशी म्हणत. हबशीचा अपभ्रंश होऊन हापूस झाला आणि त्यामुळेच त्याच्या इथल्या महलाला हापूस बाग म्हणून ओळखतात असं इथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.
इथल्या आंब्याच्या या वैशिष्ट्यपूर्ण आणि ऐतिहासिक गोष्टींचा समावेश हैदराबाद येथील राष्ट्रीय मानांकन संस्थेत करण्यात आलेल्या अर्जात करण्यात आला आहे. त्याचा उपयोग भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी होऊन त्याचा आपल्याला फायदा होईल असं इथल्या शेतकऱ्यांना वाटत आहे.
देशात आतापर्यंत आंब्याच्या दहा प्रजातींना भौगोलिक मानांकन देण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील कोकण हापूस आणि मराठवाड्यातील केशर आंब्याचा त्यामध्ये समावेश आहे. नजिकच्या काळात त्यामध्ये शिवनेरी हापूसची भर पडल्यास इथल्या आंब्याच्या लागवडीचे क्षेत्र वाढून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि अनेक ऐतिहासिक ठिकाणांबरोबरच इथला हा शिवनेरी हापूस देखील पर्यटकांच्या आकर्षणाच केंद्र ठरणार आहे.