(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Onion Farmer : लासलगाव बाजार समितीनं कांदा बाजार भावाच्या बाबतीत देशाचं नेतृत्व करावं, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी
गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात प्रचंड घसरण झाल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरत निघून नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे.
Onion Farmer : आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असा नावलौकिक असलेली लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला दैनंदिन लिलावात देशात सर्वाधिक भाव द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे. लासलगाव बाजार समितीने कांदा बाजार भावाच्या बाबतीत देशाचे नेतृत्व करावे असेही दिघोळे म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात प्रचंड घसरण झाल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरत निघून नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना असल्याचे दिघोळे म्हणाले. त्या पार्श्वभूमीवर भारत दिघोळे यांनी बाजार समितीच्या आवारात कांदा उत्पादक शेतकरी, कांदा खरेदीदार व्यापारी तसेच बाजार समितीचे प्रशासन मंडळ यांच्यासोबत याबाबत सविस्तर चर्चा केली.
कांद्याच्या पिकासाठी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती राज्याततच नव्हे तर देशात, संपूर्ण आशिया खंडात नावलौकिक मिळवलेली एकमेव बाजार समिती आहे. गेल्या 75 वर्षांपासून कांद्याच्या बाबतीत लासलगाव बाजार समिती आशिया खंडातील सर्वाधिक मोठी बाजारपेठ या नावाने नेतृत्व करत आहे. परंतू या बाजार समितीत शेतकऱ्यांच्या कांद्याला अपवाद वगळता नेहमीच नाशिक जिल्ह्यातील व राज्यातील किंवा देशातील इतर बाजार समित्यांपेक्षा अपवाद सतत कमी भाव मिळत असतात. राज्यात सर्वाधिक कांदा उत्पादन घेणाऱ्या नाशिक जिल्ह्यासह औरंगाबाद, धुळे, जळगाव, अहमदनगर या जिल्ह्यांतून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हजारो कांदा उत्पादक शेतकरी आपला कांदा विक्रीसाठी घेऊन येत असतात. मात्र, त्यांना अपेक्षीत दर मिळत नाही.
लासलगाव बाजार समितीचा इतका मोठा नावलौकिक असतानाही या बाजार समितीत शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याने गेल्या काही वर्षांपासून अनेक शेतकऱ्यांनी या बाजार समितीकडे पाठ फिरवल्याचे निदर्शनास आले आहे. म्हणून तरी लासलगाव बाजार समितीने व व्यापारी बांधवांनी पुढाकार घेऊन संपूर्ण देशात दैनंदिन कांदा लिलावात शेतकऱ्यांच्या कांद्याला सर्वाधिक भाव दिला जावा. जेणेकरून लासलगाव बाजार समितीचे कांदा बाजार भाव बघून देशातील शेतकऱ्यांचे कांद्याचे बाजार भाव व त्याचा राज्यातील व देशातील कांदा उत्पादकांना मोठा फायदा होईल.
निसर्गाचा लहरीपणा, बोगस बियाणे, पाणीटंचाई, कृत्रिम वीज टंचाई, अतिवृष्टी, गारपिट, इंधन दरवाढ, महागडी खते औषधे, वाढलेले मजुरीचे दर यामुळे कांदा उत्पादनाचा प्रति एकरी खर्च हा प्रचंड वाढला आहे. येणाऱ्या काळात कमीतकमी प्रति किलो 30 रुपये दर मिळाल्यास कांदा उत्पादकांचा उत्पादन खर्च भरुन निघून थोडाफार नफा होईल यासाठी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढाकार घ्यावा, अशी भावना भारत दिघोळे यांनी व्यक्त केली.
महत्त्वाच्या बातम्या: