वर्षावर गेल्यास कारवाई! मग काय करायचे ? आझाद मैदानावर ओरडून ओरडून मरायचे? अजित नवलेंचा सरकारला सवाल
पोलीस निरीक्षक कार्यालय मलबार हिल यांच्याकडून अजित नवले यांनी नोटीस आली आहे. वर्षावर गेल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा उल्लेख नोटीसमध्य करण्यात आला आहे.
अहिल्यानगर : दुष्काळग्रस्त शेतकरी श्रमिकांच्या विविध मागण्यांसाठी अकोले येथे राज्यव्यापी महामुक्काम सत्याग्रह सुरु करण्यात आले आहे. किसान सभेसह अन्य संघटना देखील यामध्ये सहभागी झाल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास 26 ऑक्टोबरपासून अकोले ते मुंबई वाहनांचा भव्य लॉंग मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती किसासन सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी दिली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यापर्यंत आंदोलन नेण्याचा निर्धार केल्याचे नवले म्हणाले. दरम्यान, यानंतर पोलीस निरीक्षक कार्यालय मलबार हिल यांच्याकडून अजित नवले यांनी नोटीस आली आहे. वर्षावर गेल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा उल्लेख नोटीसमध्य करण्यात आला आहे. मग काय करायचे ? आझाद मैदानवर ओरडून ओरडून मरायचे ?
काय गोळ्या घालायच्या घाला. आम्ही लोकशाही मार्गाने लढणार असल्याचे नवले म्हणाले.
नेमक्या काय आहेत मागण्या?
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान द्यावे, वनजमीन, देवस्थान जमीन, गायरान जमीन आणि घरांच्या तळजमिनी कसणाऱ्यांच्या नावे कराव्यात, नमो शेतकरी सन्मान योजनेचे थकीत दोन हप्ते तातडीने अदा करावेत आणि पीक विमा योजनेतील विविध ट्रिगर लागू करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, तसेच केवायसी प्रक्रिया बंद असल्याने योजनेतून वगळण्यात आलेल्या ८१ लाख लाडक्या बहिणींना पुन्हा योजनेत समाविष्ट करून केवायसी प्रक्रिया सुरू ठेवावी, या मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभा, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (CITU), अखिल भारतीय जनवादी महिला संघटना (AIDWA) आणि डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) यांच्या वतीने अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथे राज्यव्यापी महामुक्काम सत्याग्रह सुरू करण्यात आला आहे. तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनातून राज्यभरातील शेतकरी, कामगार, महिला आणि श्रमिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी निर्धार व्यक्त करण्यात आला.
आंदोलनाची व्याप्ती वाढवण्यासाठी उद्या, 22 ऑक्टोबर रोजी अकोले येथे भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) यांच्या ज्येष्ठ नेत्या वृंदा करात, पक्षाच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य डॉ. अशोक ढवळे, माजी आमदार जीवा पांडू गावित, आमदार विनोद निकोले आणि डॉ. अजित नवले यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेतून राज्यभरातील शेतकरी, कामगार, महिला आणि श्रमिकांच्या मागण्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे.
मागण्या मान्य न झाल्यास अकोले ते मुंबई लॉंग मार्च!
सरकारने मागण्यांची तातडीने दखल घेऊन त्यांची अंमलबजावणी करावी, यासाठी २१ ते २६ ऑक्टोबरदरम्यान महामुक्काम सत्याग्रह सुरू ठेवण्यात येणार आहे. सरकारने मागण्या मान्य न केल्यास आणि त्यांची ठोस अंमलबजावणी न झाल्यास २६ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यांमधील हजारो शेतकरी ट्रॅक्टर, पिकअप आणि अन्य वाहनांसह अकोले येथे दाखल होणार आहेत. तेथून अकोले ते मुंबई असा वाहनांचा भव्य लॉंग मार्च काढण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यापर्यंत आंदोलन नेण्याचा निर्धार!
आंदोलनांच्या वेळी आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी अनेकदा मंत्र्यांची समिती नेमली जाते. या समितीमार्फत काही मागण्या मान्य केल्याचे जाहीर केले जाते. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणीची वेळ येताच संबंधित मंत्री, ‘आमच्या हातात काही नाही; मुख्यमंत्रीच याबाबत निर्णय घेतील,’ अशी भूमिका घेतात. त्यामुळे यावेळी आंदोलन थेट राज्याचे मुख्यमंत्री यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यापर्यंत नेण्याचा निर्णय किसान सभेच्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला आहे. शेतकरी, कामगार, महिला आणि श्रमिकांच्या मागण्यांबाबत सरकारला ठोस निर्णय घेण्यास भाग पाडण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
८१ लाख लाडक्या बहिणींना योजनेत पुन्हा समाविष्ट करा!
लाडकी बहीण योजनेची केवायसी प्रक्रिया बंद असल्यामुळे सुमारे ८१ लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आल्याचा प्रश्न आंदोलनात उपस्थित करण्यात येत आहे. या महिलांना पुन्हा योजनेत समाविष्ट करावे, केवायसी प्रक्रिया नियमितपणे सुरू ठेवावी आणि पात्र महिलांचे थकीत मानधन तातडीने जमा करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. महिलांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीत खंड पडू नये आणि तांत्रिक प्रक्रियेच्या अडचणींमुळे पात्र महिलांना योजनेच्या लाभापासून वंचित ठेवू नये, यासाठी सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी भूमिका अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने घेतली आहे.
राज्यभरातील शेतकऱ्यांना लॉंग मार्च मध्ये सहभागी होण्याचे आवाहन
दुष्काळी मदत, कर्जमाफी, नियमित कर्जदारांना प्रोत्साहन अनुदान, पीक विमा भरपाई, कसणाऱ्यांच्या जमिनींचे हक्क आणि लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांचे प्रश्न हे राज्यातील शेतकरी, कामगार आणि महिलांच्या जीवनाशी निगडित महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे महाराष्ट्रभरातील शेतकरी, कामगार आणि महिलांनी २६ ऑक्टोबर रोजी अकोले येथे मोठ्या संख्येने जमून अकोले ते मुंबई लॉंग मार्चमध्ये सहभागी व्हावे आणि आपल्या न्याय्य मागण्यांसाठी पूर्ण ताकदीने संघर्षात उतरावे, असे आवाहन डॉ. अशोक ढवळे, माजी आमदार जीवा पांडू गावीत, आमदार विनोद निकोले, डॉ. अजित नवले, यशवंत झाडे, उमेश देशमुख आदींनी केले आहे.
तहसील कार्यालयासमोर मुक्काम ठोकून संघर्ष सुरू ठेवणार!
महामुक्काम सत्याग्रह यशस्वी करण्यासाठी सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, ज्ञानेश्वर काकड, ताराचंद विघे, मथुराबाई बर्डे, शिवराम लहामटे, राजू गंभीरे, गणेश ताजणे, एकनाथ मेंगाळ, संगीता साळवे, हेमलता शेळके, सुमन विरणक, काळू मेंगाळ, जुलेखा गोडे, कुसुम डोके, आदी कार्यकर्ते मेहनत घेत आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत तहसील कार्यालयासमोरच मुक्काम ठोकून संघर्ष सुरू ठेवण्याचा संकल्प आंदोलकांनी व्यक्त केला आहे.






















