Sugarcane FRP : कर्नाटकचा FRP पॅटर्न, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना इथेनॉल विक्रीचाही मिळणार लाभ, देशात पहिलाच प्रयोग
Sugarcane FRP : कर्नाटकमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आता इथेनॉल विक्रीचाही लाभ मिळणार आहे. हा देशातील पहिलाच प्रयोग आहे.
Sugarcane FRP : कर्नाटकमधील (Karnataka) ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या (Sugarcane Farmers) दृष्टीनं एक महत्त्वाची बातमी आहे. कर्नाटकमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आता इथेनॉल विक्रीचाही लाभ मिळणार आहे. हा देशातील पहिलाच प्रयोग आहे. प्रतिटन ऊसामागे एफआरपीशिवाय (FRP) शेतकऱ्यांना अतिरिक्त 50 रुपये देण्यात येणार असल्याची माहिती कर्नाटकचे मंत्री शंकर पाटील मुनेनकोप्पा (Shankar Patil Munenakoppa) यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांना प्रतिटन 3 हजार 100 रूपये मिळणार
कर्नाटकमध्ये FRP शिवाय इथेनॉल विक्रीतून येणाऱ्या रकमेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. FRP व्यतिरिक्त इथोनॉलचा लाभ शेतकऱ्यांना देण्याचा हा निर्णय ऐतिहासिक असल्याचं कर्नाटकचे मंत्री शंकर पाटील मुनेनकोप्पा यांनी सांगितलं आहे. इथेनॅाल विक्रीतून आलेली अधिकची रक्कम आता शेतकऱ्यांना मिळणार आहे. यामुळं आता शेतकऱ्यांना प्रतिटन 3 हजार 100 रूपये मिळू शकतात. FRP शिवाय इथेनॉलचा लाभ देण्याचा राज्याच्या साखर इतिहासातील हा पहिलाच निर्णय असल्याचे मंत्री शंकर पाटील मुनेनकोप्पा म्हणाले. या रकमेमुळं कर्नाटकातील शेतकऱ्यांना 204 कोटी रुपये अधिक मिळतील. केंद्राची FRP आणि इथेनॉलचा अधिकचा दर असे मिळून कर्नाटकातील शेतकऱ्यांना 3 हजार 100 रुपये प्रति टनापर्यंतचा दर मिळू शकेल असे पाटील यांनी सांगितले.
'या' निर्णयाचा महाराष्ट्रतही परिणाम होण्याची शक्यता
गेल्या 22 दिवसापासून कर्नाटकमध्ये ऊसाला वाढीव दर द्यावा, या मागणीसाठी विविध शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत. अशा वेळी सरकारनं इथनॅलचा लाभही शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय जरी कर्नाटक राज्यात झाला असला तरी महाराष्ट्र हे सुद्धा ऊसाचं विक्रमी उत्पादन करणारं महत्वाचं राज्य आहे. साखर कारखान्यांना विविध मार्गातून उत्पन्न मिळते. यामध्ये मोलॅसिस, विजनिर्मिती, CNG सारखे प्रकल्प असतील किंवा इथेनॉल असेल यातून कारखान्यांना चांगले उत्पन्न मिळते. महाराष्ट्रात देखील गेल्या आठ वर्षात साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीत मोठी वाढ केली आहे. त्यामुळं कर्नाटक सरकारच्या निर्णयानंतर याचे महाराष्ट्रात काय परिणाम होतील का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
कर्नाटक हे FRP पेक्षा अधिक दर देणारं पहिलं राज्य, मंत्री मुनेनकोप्पा यांचा दावा
कर्नाटक हे FRP पेक्षा अधिक दर देणारं देशातील पहिलं राज्य असल्याचा दावा मंत्री शंकर पाटील मुनेनकोप्पा यांनी केला आहे. अशा प्रकारची मागणी दिवंगत शरद जोशी तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केली आहे. आता आपल्या शेजारच्या कर्नाटक राज्यात असा निर्णय झाल्यामुळं याचे परिणाम महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे. यापासून शेतकऱ्यांना लाभ होईल अशी अपेक्षा आहे.
महत्त्वाच्या बातम्या: