(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Akola News : अकोल्यात बोगस कृषी उत्पादने बनवणाऱ्या कारखान्यावर कारवाई, मात्र 'मास्टरमाईंड' मोकाट
अकोला जिल्ह्यातील शिसा बोंदरखेड मार्गावरील एका शेतात विनापरवाना शेती उत्पन्न वाढवणारी खते, टॉनिक बनवणाऱ्या कारखान्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापेमारी केली.
Akola News : अकोला पोलीस आणि कृषी विभागाच्या एका कारवाईसंदर्भात संशयाचे वातावरण निर्माण झालं आहे. जिल्ह्यातील शिसा बोंदरखेड मार्गावरील एका शेतात विनापरवाना शेती उत्पन्न वाढवणारी खते, टॉनिक बनवणाऱ्या कारखान्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापेमारी केली. यावेळी आरोपीस अटक देखील केली. या कारवाईत पाच लाख रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. मात्र, या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपीचा बोलवता धनी अकोल्यातील एक मोठा कृषी व्यावसायिक असल्याची मोठी चर्चा सध्या सुरु आहे.
पोलीस आणि कृषी विभागाच्या कारवाईनंतरच्या चौकशीत या कृषी व्यावसायिकाच्या सहभागाचे धागे-दोरे दोन्ही विभागांना का मिळत नाहीत? या कृषी व्यावसायिकाला वाचवण्याचा पोलीस आणि कृषी विभागाचा नेमका उद्देश आहे का? याचा 'अर्थ' शोधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
पोलीस आणि कृषी विभागाची बोगस कृषी कारखान्यावर कारवाई
डोंगरगाव सांगळुद रोडवरील शिसा बोंदरखेड शिवारातील एका शेतात शेतकऱ्यांना बोगस कृषी साहित्य, खते आणि निविष्ठ बनवण्याचा गोरखधंदा सुरु होता. हे सारं विनापरवाना आणि बिनबोभाटपणे सुरु होतं. या ठिकाणी शेती उत्पन्न वाढवण्याचा दावा करणारी बनावट खतं, टॉनिक बनवलं जात होतं. दरम्यान, या ठिकाणी असा कारखाना चालवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकानं कृषी विभागाला सोबत घेत याठिकाणी गुरुवारी छापेमारी केली. यावेळी पोलिसांनी हे चालवणाऱ्या विनोद ज्ञानदेव हिवराळेला अटक केली आहे. तो बुलडाणा जिल्ह्यातील बोथाकाजी येथील रहिवाशी आहे.
विनोद हिवराळे हा कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता शेतीचे उत्पन्न वाढवणारे उत्पादने बनवत होता. पथकाने त्याच्या ताब्यातून रेस गोल्ड, गोल्डन प्लस, प्लेटिना प्लस, पॉवर बुस्ट, थ्रीडी प्लस, कॉटन पीजीआर, असे शेती प्रॉडक्ट बनविणारे साहित्य, असा एकूण पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी विरोधात बोरगाव मंजू पोलिस स्टेशन येथे भादंवि कलम ४२९ , जीवनाशयक वस्तू अधिनियम कलम तीन, सात ईसी कायदा, तसेच खत नियंत्रण आदेश १९८५, सात, ३५, २१ या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'मास्टरमाईंड'ला पोलीस आणि कृषी विभागाचं अभय मिळतेय का?
या प्रकरणातील आरोपी विनोद हिवराळेला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, या प्रकरणातील खरा 'मास्टरमाईंड' हा दुसराच असल्याची माहिती 'एबीपी माझा'च्या विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. हा मास्टरमाईंड अकोल्यातील मंगलदास मार्केटमध्ये कृषी सेवा केंद्र चालवणारा मोठा कृषी व्यायसायिक आहे. तोच हिवराळेच्या माध्यमातून हे सर्व रॅकेट चालवत होता. ज्या शेतात हा गोरखधंदा सुरु होता, ते शेतही याच 'मास्टरमाईंड'नं हिवराळेच्या नावावर भाड्यानं घेतलं होतं. शेतकऱ्यांच्या भवितव्याशी खेळत त्यांच्या माथी बोगस माल देणाऱ्या या खऱ्या आरोपीला पोलीस आणि कृषी विभागाचे अभय का? याची दखल सरकारनं घेणं गरजेचं आहे. या कारवाईनंतर प्रकरणातील समोर आलेल्या तथ्यात या व्यक्तीचं नाव कुठंच नसल्यानं पोलीस आणि कृषी विभागाची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कृषी विभाग आणि पोलिसांनी किमान शेतकऱ्यांच्या आयुष्याशी खेळू पाहणाऱ्या गुन्हेगारांना पाठीशी घालू नये अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.