(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Crop Insurance : पीक विमा कंपनीनं जर शेतकऱ्यांना रक्कम दिली नाही तर राज्य सरकारला द्यावी लागेल : राणा जगजितसिंह पाटील
उस्मानाबाद जिल्ह्यातील 3 लाख 57 हजार शेतकऱ्यांना खरीप 2020 चा पीक विमा मंजूर झाला आहे. हा विमा पुढच्या सहा आठवड्यात पीक विमा कंपनीला द्यावा लागणार आहे.
Ranajagjitsinha Patil on Crop Insurance : उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप 2020 चा पीक विमा मंजूर झाला आहे. जिल्ह्यातील 3 लाख 57 हजार शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार असून, त्याची एकूण रक्कम ही 510 कोटी रुपये आहे. ही रक्कम पीक विमा कंपनीला पुढच्या सहा आठवड्यात द्यावी लागेल. जर सहा आठवड्यात पीक विमा कंपनीने ही शेतकऱ्यांची रक्कम दिली नाही तर राज्य सरकारला त्याच्या पुढच्या सहा आठवड्यात शेतकऱ्यांची ही रक्कम द्यावी लागेल अशी माहिती भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. ज्याप्रमाणे 20 टक्के शेतकऱ्यांना मदत मिळाली, त्याचप्रमाणे या 80 टक्के शेतकऱ्यांना मदत मिळणे अपेक्षीत असल्याचे पाटील म्हणाले.
शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाला होता. मोठे नुकसान होऊन देखील 80 टक्के शेतकरी मदतीपासून वंचित राहिले होते. त्यांना आता ही मतद मिळणार आहे. पीक विमा कंपनीने जर रक्कम दिली नाही तर ही रक्कम राज्य सरकारला द्यावी लागणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. उच्च न्यायालयात दोन महत्त्वाचे मुद्दे मांडले होते, ती म्हणजे 72 तासांची अट. नुकसानीनंतर 72 तासानंतर काही शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती दिली होती. त्यांनाही न्याय मिळावा. तसेच 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळेल असे राज्य सरकार आणि कृषी विभागाने सांगितले होते. तरीही शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याचे पाटील म्हणाले. याबाबत वारंवार मुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्यांना सांगितले होते. मात्र, ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना मदत केली नसल्याचे पाटील म्हणाले.
श्रेयदावादाच्या लढाईत कोणी पडू नका. श्रेय तुम्ही घ्या मात्र, शेतकऱ्यांना तातडीने पैसे द्या असे पाटील म्हणाले. राज्य सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा यासाठी प्रयत्न करावेत असे पाटील म्हणाले. दरम्यान, शेतकऱ्यांची न्याय्य मागणी ग्राह्य धरुन शेतकर्यांच्या बाजूने न्यायालयाने निर्णय दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे भाजपने स्वागत केले आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी उस्मानाबादमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची अतिषबाजी करत एकमेकांना पेढे वाटून जल्लोष साजरा केला. तसेच भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकर्यांचा लढा यशस्वी झाल्याने त्यांचे देखील शेतकऱ्यांनी आभार मानले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: