Wine : वाईन विक्रीच्या निर्णयातून शेतकऱ्यांचे भले होणार का? पाहा काय म्हणतायेत शेतकरी नेते
राज्य सरकारने सुपरमार्केटमध्ये वाईनची विक्री करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. या निर्णयावर राज्यातील शेतकरी नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Wine : राज्यभरातील सुपरमार्केटमध्ये वाईनची विक्री करण्यात येणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. परंतू, सरकारच्या या निर्णयाला विविध क्षेत्रातून विरोध होत आहे. सरकारच्या या निर्णयावर सामाजिक आणि राजयकीय क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय योग्य नसल्याचे अनेकांनी म्हटले आहे. किराणा दुकानातून वाईन विक्री केल्यास त्याचे विपरीत परिणाम होतील असे काही जणांचे म्हणणे आहे. तर वाईन विक्रीतून जर चांगल्या पद्धतीने विक्री वाढून निर्यात वाढली तर शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. यातून शेतकऱ्यांच्या मालाला चांगली भाव मिळेल, असे काही नेत्यांचे म्हणणे आहे. मात्र, या निर्णयावर राज्यातील शेतकरी नेत्यांना नेमकं काय वाटतय याचा आढावा एबीपी माझाने घेतला आहे.
वाईन विक्रीच्या निर्णयावर एबीपी माझाने राज्यातील विविध शेतकरी सघटनांच्या नेत्यांशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारच्या निर्णयावर जोरदार टीका केली. यामुळे शेतकऱ्यांचा कोणताही फायदा होणार नसल्याचे यावेळी शेट्टी म्हणालेत. नेमकं शेट्टी काय म्हणालेत ते पाहुयात...
नाव शेतकऱ्याचं स्वार्थ सरकारचा - राजू शेट्टी
राज्य सरकारने घेतलेला निर्णय हा शेतकऱ्यांसाठी घेतलेला नाही. महाविकास आघाडीला एवढी जर शेतकऱ्यांची चिंता होती तर त्यांनी उसाची एफआरपी (FRP)मोडतोड करण्याचा प्रस्ताव का पाठवला होता? असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर लोकसभेत भूमिअधिग्रहण कायद्यात दुरुस्ती करायला काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी विरोध केला होता असे शेट्टी म्हणाले. यानिमित्ताने आता नवीन कारखाने काढण्यासाठी असा निर्णय घेतला आहे. हे कारखाने फक्त महाविकास आघाडीच्या नेत्यांचेच असतील असेही शेट्टी म्हणाले. शेतकऱ्यांचा जर तुम्हाला एवढा पुळका आहे तर एकरकमी एफआरपीच्या विरोधात तुम्ही निर्णय का घेतला असे शेट्टी यावेळी म्हणाले. त्यामुळे या निर्णायाने फक्त शेतकऱ्यांचे नाव आहे, स्वार्थ मात्र सरकारचा असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.
पुरोगामीत्वाचे नाव घेणाऱ्या सरकारला हा निर्णय शोभत नाही - डॉ. अजित नवले
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि शेतीमालाला चांगला भाव मिळावा यासाठी इतर अनेक गोष्टी करणे शक्य आहे, असे असतानाही राज्य सरकारने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मद्यसेवनाला प्रोत्साहन मिळेल असा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पुरोगामीत्वाचे नाव घेणाऱ्या महाविकास आघाडीला शोभत नसल्याची प्रतिक्रिया किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी दिली. शेतीमालाला मिळणाऱ्या रास्त भावाचा मुद्दा विचालीत करण्यासाठी, मद्य क्षेत्रातील लॉभीला मदत करण्यासाठी हा वाईट निर्णय घेण्यात आल्याचे नवले एबीपी माझाशी बोलताना म्हणाले. राज्य सरकारने मद्य सेवनाला उत्तेजन देणारा हा निर्णय मागे घ्यावा. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढवण्याच्या अन्य मार्गावर प्रामाणिकपणे प्रयत्न करावा असे अजित नवले यावेळी म्हणाले. या निर्णयाचा बालमनावर आणि समाजावर वाईट परिणाम होईल. मद्य वाईट नाही असा समज होईल. व्यसनाधिनतेचे आकर्षण वाढेल, दारुला मान्यता वाढेल असे नवले म्हणाले. दुधाला आधारभावाचे संरक्षण द्यायचे नाही आणि दारुला प्रोत्साहन द्यायचे हे अत्यंत चुकीचे असल्याचे नवले यावेळी म्हणाले.
मंत्रालयातही पाण्याऐवजी वाईन ठेवा- सदाभाऊ खोत
या राज्य सरकारचे मी मद्य विक्री महाविकास आघाडी असे नामकरण केले असल्याची टीका रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी केली. शेतकऱ्यांच्या आडोशाला पडून वाईन उद्योजकांचे भले करण्याचा निर्णय असल्याचे खोत म्हणाले. या निर्णयाने शेतकऱ्यांचे कोणत्याही प्रकारे भले होणार नाही, उद्योजकांचे भले यामधून होणार आहे. वाईन हे जर पाणी असे वाटत असेल तर, मद अंगणवाडीच वाईन द्या, शासकीय दवाखान्यात रुग्णांसाठी खाद्याबरोबर वाईन द्या, देवासमोर तिर्थ म्हणून वाईन ठेवा, मंत्रालयात पाणी म्हणून वाईन ठेवा अशी टीका खोत यांनी राज्य सरकारवर केली. तुम्हाला शेतकऱ्यांचे भले करायचे तर दोन साखर कारखान्यामधील 25 किलोमटर अंतराची अट रद्द करा. ज्याला कारखाना काढायचा आहे त्याला काढूद्या असे खोत यावेळी म्हणाले. तुमच्या हिंमत असेल तर शेतकऱ्यांचा शेतमाल नियमनमुक्त करा, शेतकऱ्याला त्याचा शेमतामल कुठेही खरेदी विक्री करता आला पाहिजे असे खोत यावेळी म्हणाले. शेतकऱ्यांच्या नावाने नुसते गळे काढत आहेत. वाईन उद्योगात सगळ्या नेत्यांचे पैसे गुंतले असल्याचा आरोप त्यांनी केला. पंजाबसारखे अंमली पदार्थायत महाराष्ट्र बरबाद करायचा आहे का? असा सवाल खोत यांनी केला. वाईन सगळ्या ठिकाणी ठेवा, पण बाकीचे पण सगळे मुक्त करा. साखर उद्योग खुला करा, बाजारपेठ मुक्त करा, शेतमाल खुला करा असे खोत यावेळी म्हणाले.
दारुपेक्षा परवाना पद्धत जास्त विषारी - अमर हबीब
सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत माझी तिसरी भूमिका आहे. सरकारने परवाना पद्धत कशावर ठेऊ नये. दारुपेक्षा परवाना पद्धत रोग जास्त घातक असल्याची प्रतिक्रिया किसानपुत्र आंदोलनाचे प्रमुख अमर हबीब यांनी दिली आहे. परवाना पद्धत हे सरकारचे हे विषारी शस्त्र आहे. त्यामुळे परवाने मुक्त करावे. ज्यांना प्यायची आहे ते पितील, ज्यांना नाही प्यायची ते पिणार नाही. महाराष्ट्रात वारकरी चळवळ झाली आहे, अनेक सामाजिक चळवळी झाल्या आहेत. सरकारच्या हातात दारुचे नियंत्रण असल्यामुळे राजकारणाचे गुन्हेगारीकरण होईल असे अमर हबीब म्हणाले. परवाने देताना नेते पैसे खाणार आहेतच असेही ते म्हणाले. राजकीय लोक त्यांच्या बगबच्चांची सोय करत असल्याचा आरोप त्यांनी केला. गुंड पोसण्याचा हा नवा कार्यक्रम असल्याचेही अमर हबीब एबीपी माझाशी बोलताना म्हणाले.
एकूणच विचार केला तर राज्य सरकारने वाईन विक्रीच्या निर्णयाबाबत शेतकरी नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयाने शेतकऱ्यांचा कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नसल्याचे शेतकरी नेत्यांनी म्हटले आहे. उद्योजकांचे भले करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे ते म्हणालेत. शेतकऱ्यांना यातून कोणताही फायदा होणार नसल्याची भूमिका शेतकरी नेत्यांनी मांडली आहे.