(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sugarcane : FRP मध्ये केलेली वाढ म्हणजे डोंगर पोखरुन हाती लागलेली उंदराची पिल्ली, राजू शेट्टींची सरकारवर खोचक टीका
Sugarcane FRP : FRP च्या मुद्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Saghtana) प्रमुख राजू शेट्टींनी (Raju Shetti) सरकारवर जोरदार टीका केली आहे.
Sugarcane FRP : केंद्र सरकराने (Central Government) ऊसाच्या FRP मध्ये प्रतिक्विंटल 10 रुपयांची वाढ केली आहे. नव्या हंगामात ऊसाची एफआरपी 315 रुपये होणार आहे. यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Saghtana) प्रमुख राजू शेट्टींनी (Raju Shetti) सरकारवर जोरदार टीका केली आहे. केंद्र सरकारनं जी 10 रुपयांची वाढ केली आहे ती वाढ कोणत्या आधारे केली. उत्पादन खर्च कोणता धरला. ही डोंगर पोखरुन उंदीर नव्हे तर उंदराची पिल्ली हाताला लागलेला प्रकार असल्याचे मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं.
केंद्र सरकारने FRP मध्ये क्विंटलला दहा रुपये म्हणजेच प्रति टनास शंभर रुपयाची वाढ केली आहे. ही वाढ करुन शेतकऱ्यांना मोठी मदत केली असल्याचा सरकार डांगोरा पिटत आहे. वास्तविक पाहता केंद्र सरकारने दहा रुपयांची केलेली वाढ कोणत्या आधारे केली. उत्पादन खर्च कोणता धरला असे सवाल राजू शेट्टींनी उपस्थित केले आहेत.
वर्षभरात ऊसाचा उत्पादन खर्च 33 टक्क्यांनी वाढला
वास्तविक पाहता उत्पादन खर्चामध्ये गेल्या वर्षभरात जवळपास 33 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये रासायनिक खतांची वाढ ही 22 टक्क्याहून होऊन अधिक वाढलेली आहे. यामुळं ऊसाच्या FRP मध्ये झालेली वाढ ही फक्त सव्वातीन टक्के असल्याने यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. सध्या उसाची शेती ही तोट्याची शेती झाली असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. कृषी मूल्य आयोगामध्ये बसलेल्या विद्वानांनी एक टन उसाचा खर्च 1570 रुपये दाखवलेला आहे. त्या उत्पादन खर्चावर आपण ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दुप्पट पैसे देत आहोत, हा डांगोरा पेटवत आहे. कृषी मूल्य आयोगाने कोणत्या संशोधन केंद्रामध्ये अथवा देशातील कोणत्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये इतक्या खर्चात काढला हे दाखवून द्यावे असेही राजू शेट्टी म्हणाले. सरकारने साखर कारखानदारांना खुश करण्यासाठी ही एफआरपी वाढवली असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.
शेतकऱ्यांना महागाईचा मोठा फटका
गेल्या पाच वर्षांमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाढलेल्या महागाईचा मोठा फटका बसला आहे. यामध्ये रासायनिक खते ,मजुरी ,मशागत, तोडणी वाहतूक ,खते ,कीटकनाशके यांचे दर गगनाला जाऊन भिडलेले आहेत. या सर्व गोष्टींचा विचार केल्यास गेल्या पाच वर्षात फक्त शेतकऱ्यांना टनाला 350 रुपयांची वाढ मिळाली असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.
नवीन MSP 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ऊसावरील एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 10 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. सरकारनं वाढवलेली एमएसपी नवीन ऊस हंगामापासून लागू होणार आहे. ही एमएसपी 1 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होणार असून पुढील वर्षी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत लागू राहणार आहे. 2021 मध्ये ऊसाचा एमएसपी 5 रुपयांनी वाढवून 290 रुपये करण्यात आला होती. 2022 मध्ये त्यात 15 रुपयांनी वाढ करून 305 रुपये करण्यात आली. आता 10 रुपयांनी वाढ झाल्याने नव्या हंगामात उसाची एफआरपी 315 रुपये होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: