Market Committee Election : राज्यातील 281 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, 29 जानेवारी 2023 ला होणार मतदान
राज्यातील 281 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर जाहीर करण्यात आला आहे.
Market Committee Election : निवडणुकीस पात्र असलेल्या राज्यातील 281 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर जाहीर करण्यात आला आहे. याबाबतची प्रक्रिया आजपासून (7 सप्टेंबर) सुरू होत असल्याची माहिती प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी दिली आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून 31 डिसेंबर 2022 अखेर निवडणुकीस पात्र असलेल्या बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणूक कार्यक्रमानुसार कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे मतदान 29 जानेवारी 2023 रोजी तर मतमोजणी 30 जानेवारी 2023 ला होणार आहे.
प्राधिकरणाने 6 आणि 21 ऑक्टोबर 2021 रोजीच्या आदेशानुसार निवडणुकीस पात्र कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु केल्या होत्या. मात्र, कृषी पत संस्थांच्या निवडणुकीनंतर कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणूका सुरु करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर 13 याचिका दाखल झाल्या होत्या. त्याअनुषंगाने उच्च न्यायालयानं निवडणुकीस पात्र विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुका तातडीनं पूर्ण करुन त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणुका पूर्ण करण्याबाबत 18 नोव्हेंबर 2021 रोजी आदेश दिले होते. त्यानुसार आवश्यक कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर प्राधिकरणाने आज निवडणूक कायक्रम जाहीर केला आहे.
मतदार यादी 1 नोव्हेंबर 2022 पर्यंत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे निर्देश
बाजार समितीच्या निवडणुकीसाठी बाजार क्षेत्रातील कार्यरत प्राथमिक कृषी पत संस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था व ग्रामपंचायत यांचे सदस्य मतदार असल्यामुळं या सदस्यांची सूची 27 सप्टेंबर 2022 पर्यंत जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश संबंधित जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व गट विकास अधिकारी यांना दिले आहेत. याशिवाय बाजार क्षेत्रातील परवाना धारक व्यापारी, आडते व हमाल, तोलाईदार हे बाजार समितीचे मतदार असल्यामुळे या मतदारांची यादी 1 नोव्हेंबर 2022 पर्यंत जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश संबंधित बाजार समित्यांना दिलेले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समित्यांची प्रारूप मतदार यादी 14 नोव्हेंबर रोजी आणि अंतिम मतदार यादी 7 डिसेंबर 2022 रोजी प्रसिद्ध होणार आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे मतदान 29 जानेवारी 2023 रोजी व मतमोजणी 30 जानेवारी 2023 रोजी होणार आहे.
दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक घेण्यासंदर्भात उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद, नागपूर व मुंबई येथे मोठ्या प्रमाणात याचिका दाखल झालेल्या असताना उच्च न्यायालयाने श्रीरामपूर, राहता, जाफ्राबाद, भोकरदन, वसमत आणि धारुर या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रिया विनिर्दिष्ट कालावधीत पूर्ण करणेबाबत आदेश दिले. त्यानुसार प्राधिकरणाने या बाजार समित्यांच्या निवडणूका 2 सप्टेंबर 2022 च्या आदेशानुसार सुरु केलेल्या आहेत. या बाजार समित्यांचे मतदान व मतमोजणी अनुक्रमे 18 डिसेंबर आणि 19 डिसेंबर 2022 रोजी होणार असल्याची माहितीही डॉ. जगदीश पाटील यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या: