धाराशिवमध्ये सोयाबीन पेरलं पण साधा अंकूरही फुटेना, महाबीजचं बियाणं बोगस निघालं, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट
Dhrashiv: यामुळे मजुरी, बियाणं, खते अशा सर्व गोष्टींवर दुहेरी खर्च होणार आहे. शेतकऱ्यांच्या मते, महाबीजसारख्या सरकारी संस्थेच्या बियाण्यावर विश्वास ठेवला तरी असा फसवणुकीचा अनुभव येतोय.

Dharashiv: महाबीजचे बियाणे म्हणजे शेतकऱ्याला विश्वासाची हमी असते. मात्र धाराशिव जिल्ह्यात महाबीजच्या विश्वासाला तडा गेल्याच पाहायला मिळते. सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्यात त्यामध्ये जवळपास 90% तक्रारी महाबीजच्या आहेत. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कृषी विभागाकडून पंचनामा करण्यात आला त्यामध्ये बियाण्यात दोष असल्याचा आढळल्याच कृषी विभागाकडून सांगण्यात आले. जिल्हाभरात अनेक शेतकऱ्यांचे बियाण उगवलेलं नाही त्यामुळे दुबार पेरणीचा संकट ओढवलं आहे.
पेरलं पण अंकुर फुटेना- दुबार पेरणीचं संकट
धाराशिव जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी सोयाबीन पेरणी केली. पेरणीनंतर आठवड्यानंतरही अंकुर न फुटल्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी नोंदवल्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत कृषी विभागाने विविध गावांमध्ये पंचनामे सुरू केले. पंचनाम्याच्या अहवालातून महाबीजच्या बियाण्यांमध्ये दोष असल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. अनेकांनी कर्ज काढून बियाणं खरेदी केलं होतं. मात्र बियाणं उगवलंच नाही, त्यामुळे दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. यामुळे मजुरी, बियाणं, खते अशा सर्व गोष्टींवर दुहेरी खर्च होणार आहे. शेतकऱ्यांच्या मते, महाबीजसारख्या सरकारी संस्थेच्या बियाण्यावर विश्वास ठेवला तरी असा फसवणुकीचा अनुभव येतोय.
धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, तुळजापूर, लोहारा आणि उमरगा तालुक्यात साधारण 25 ते 30 तक्रारी या बियाणं उगवलं नसल्याच्या आल्या आहेत. त्यात 90% बियाणं हे महाबीजच आहे. या तक्रारींची पाहणी केल्यानंतर ही बियाणं सदोष असल्याचं समोर आलं असल्याचं कृृृषी विभागाचे धाराशिव उपाध्यक्ष यांनी सांगितले.
बियाणं सदोष निघालं...
जून महिन्यात पेरणीसाठी समाधानकारक पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. धाराशिव मध्ये आत्तापर्यंत 51 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मात्र महाबीजचे सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्रारी अनेक शेतकऱ्यांनी दाखल केल्या आहेत. परिणामी संबंधित शेतकऱ्यांना सुमारे 50 एकरांवर दुबार पेरणीचा खर्च करावा लागणार आहे. मे महिन्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने धाराशिव जिल्ह्यातील 34 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली होती. जूनच्या सुरुवातीला ही चांगला पाऊस झाला. जिल्ह्याचा खरीपपेरा हा प्रस्तावित क्षेत्राच्या 51% म्हणजेच तब्बल 2 लाख 86 हजार 641 हेक्टर वर झाला आहे. शेतकऱ्यांचा कल सोयाबीन पेरणीवरच होता.
























