Agriculture News : शेणापासून गोवऱ्या तयार करुन पाडली उत्पन्नात भर, वर्ध्यातील अल्पभूधारक शेतकऱ्याचा उपक्रम
Agriculture News : कमी शेती असलेल्या तरुण शेतकऱ्याने बाजारात गोवऱ्याची उपलब्धता आणि त्याची मागणी ओळखली. आपल्या शेतात गायीच्या शेणापासून हा शेतकरी गोवऱ्या तयार करतो आणि त्या गोवऱ्या आलेल्या ऑर्डरप्रमाणे विकतो.
Agriculture News : अंत्यसंस्कार आणि धार्मिक कार्यात महत्वाची समजली जाणारी गोवरी शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळवून देऊ शकते हे सिद्ध केले वर्ध्याच्या (Wardha) एका तरुण शेतकऱ्याने. कमी शेती असलेल्या तरुण शेतकऱ्याने (Farmar) बाजारात शेणापासून तयार होणाऱ्या गोवऱ्याची उपलब्धता आणि त्याची मागणी ओळखली. आपल्या शेतात गायीच्या शेणापासून हा शेतकरी गोवऱ्या तयार करतो आणि त्या गोवऱ्या आलेल्या ऑर्डरप्रमाणे विकतो. त्याला मिळणाऱ्या ऑर्डर देखील वाढू लागल्या आहेत.
मार्केट रिसर्च करुन गोवऱ्या तयार करण्यास सुरुवात
वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील कान्हापूर-मोर्चापूर परिसरात शेतकरी मंगेश उराडे राहतात. अल्पभूधारक शेतकरी असलेल्या मंगेश उराडे यांच्याकडे दोन गायी आहेत आणि काही कालवडी आहेत. गायीच्या दुधापासून पैसे मिळतात. तर शेणापासून शेणखत मिळते. शेणखत जर विकले तर त्याला ट्रॉलीप्रमाणे अडीच ते तीन हजार रुपये मिळतात. पण शेणापासून जर गोवऱ्या तयार केल्या आणि त्या विकल्या तर जास्त पैसे मिळतील याच कल्पनेने या शेतकऱ्याने मार्केटमध्ये गोवऱ्याला किंमत किती? याचा शोध घेतला. तीन ते साडेतीन रुपयांना बाजारात गोवरी विकली जाते तर गवळाऊ गायीच्या गोवरीची किंमत सात ते नऊ रुपये असल्याचा या शेतकऱ्याचा मार्केट रिसर्च सांगतो. त्यामुळे या शेतकऱ्याने आपल्या शेतात शेणापासून गोवऱ्या तयार करायला सुरुवात केली. हळूहळू गोवऱ्या जमा झाल्या. त्या वर्ध्याच्या स्मशानभूमीसह इतर ठिकाणी देखील विकल्या गेल्या. त्याला पैसे देखील मिळाले.
अंत्यसंस्कार, होमहवन अशा धार्मिक विधींसाठी गोवऱ्यांची मागणी
अंत्यविधी, होमहवन, पाणग्यांचा स्वयंपाक, विविध मंदिरे आणि मोठ्या कार्यक्रमात देखील या गोवऱ्यांना मागणी आहे. महिन्याकाठी पाच हजार गोवऱ्या तयार केल्या जात आहेत. तीन रुपये प्रती गोवरी या प्रमाणे शेतकऱ्याला निव्वळ गोवरीपासून 15 हजार रुपयाचे उत्पन्न मिळत आहे. सकाळ-सायंकाळ दोन गायीचे दररोजचे शेण गोळा करुन ठेवणे आणि सकाळी एक तास गोवऱ्या तयार करणे असा उपक्रम दररोज राबवला जातो. आई, वडील, भाऊ या गोवऱ्या तयार करण्यात मदत करतात.
आता गोवऱ्याच्या उत्पन्नाचीही भर
मंगेश उराडे यांच्याकडे वडिलांची तीन एकर शेती आहे. या तीन एकर शेतीमध्ये उराडे परिवार पारंपारिक पिके घेत होता. तूर, कपाशीच्या भरवश्यावर चाललेल्या शेतीत मात्र फारसे काही शिल्लक पडत नव्हते. पुढे या शेतकऱ्याने आई-वडिलांना भाजीपाल्याची शेती करण्याचा आग्रह धरला. त्याला सुरुवात देखील केली आणि हळूहळू आर्थिक चित्र पालटू लागले. आता यात गोवऱ्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नाची देखील भर पडली आहे.
अल्पभूधारक शेतकऱ्याचा शेणखतापासून गोवऱ्या तयार करणारा हा व्यवसाय उत्पन्नात भर तर टाकणारा ठरली आहे याशिवाय गोवऱ्यांची उपलब्धता देखील वाढली आहे.