NHB Subsidy Schemes : राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत 100 दिवसात शेतकऱ्यांना मिळणार अनुदान
NHB Subsidy Schemes : राष्ट्रीय फलोत्पादन अभियान ( National Horticulture Board) या योजनेच्या माध्यमातून आता 100 दिवसात शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे.
NHB Subsidy Schemes : देशभरातील शेतकरी (Farmers) आपापल्या विभागानुसार फळपिकांची लागवड करत आहेत. पारंपारिक पिकांना बगल देत शेतात नवनवीन प्रयोग करत आहेत. सध्या फळपिकांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असल्याचे दिसत आहे. सरकार देखील फळबाग लागवड (Orchard Planting) करण्यासाठी विविध योजना राबवत आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियान (National Horticulture Board) ही त्यातीलच एक योजना आहे. आता या योजनेच्या माध्यमातून आता 100 दिवसात शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. पहिलं हे अनुदान मिळण्यासाठी मिळण्यासाठी सहा ते आठ महिन्यांचा कालावधी लागत होता.
शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रोत्साहन
अर्थव्यवस्थेत भरीव योगदानाची शक्यता पाहून सरकार या योजनेद्वारे शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाद्वारे शेतकऱ्यांना उच्च मूल्यवर्धनासह पिके घेण्यास प्रोत्साहन दिले जात. फलोत्पादनामध्ये फळे, भाज्या, मसाले, फुले आणि नारळ यांचा समावेश होतो. शेतकऱ्यांना अन्न पिकांपेक्षा फळबागांमध्ये जास्त उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. अन्नधान्य पिके घेण्यासाठी पुरेशी जमीन आवश्यक असते, तर कमी जमिनीवर बागायती कामे सहज करता येतात. बागायती पिकांच्या मदतीने लहान व अत्यल्प भूधारक शेतकरी त्यांच्या कमी जमिनीवरही अधिक नफा मिळवू शकतात. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना बागायती पिकांसाठी शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी फलोत्पादन पिकांना प्रोत्साहन देणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे.
विहीत खर्चाच्या 35 ते 50 टक्के अनुदान मिळणार
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ (NHB) देशातील व्यावसायिक फलोत्पादनासह पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देण्यासाठी हे अनुदान देते. या योजनांतर्गत, विहित खर्चाच्या नियमांनुसार विविध घटकांसाठी 35 ते 50 टक्के अनुदान दिले जाते. अर्जाची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल स्वरुपात असणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या अर्जांची तपासणी झाल्यावर कर्जास मंजुरी मिळणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बागायती पिकांच्या लागवडीसाठी आर्थिक मदत, अनुदान, कर्ज आणि प्रशिक्षण दिले जाते. या पिकांची लागवड केल्याने शेतकऱ्यांना कमी वेळेत उत्पादन मिळते. तसेच फलोत्पादनात आधुनिक तंत्रे व वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब केल्यास जोखीम कमी होते. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा कोणताही शेतकरी आपल्या जिल्ह्याच्या जवळच्या कृषी विभागाशी संपर्क साधू शकतो. अधिक माहितीसाठी तुम्ही नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड (nhb.gov.in) या राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या अधिकृत पोर्टललाही भेट देऊ शकता.
महत्त्वाच्या बातम्या: