(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Onion : सोलापुरात कांद्याच्या दरात वाढ, प्रति किलोसाठी मिळतोय एवढा दर; शेतकऱ्यांना दिलासा
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. सध्या कांद्याच्य दरात वाढ होताना दिसत आहे.
Onion News : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. सध्या कांद्याच्य दरात वाढ होताना दिसत आहे. सोलापुरात कांद्याला प्रति किलोसाठी 40 ते 45 रुपयापर्यंतचा भाव मिळत आहे. कांद्याची आवक घटल्यानं सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे भाव वाढले आहेत. याचा मात्र, शेतकऱ्यांना फायदा होत असून, त्यांना दिलासा मिळाला आहे.
मागील आठवड्यात कांद्याला होता 25 ते 30 रुपयांचा दर
सोलापुरात कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. प्रति किलो कांद्याला 40 ते 45 रुपयेपर्यंतचा भाव मिळत आहे. कांद्याची आवक घटल्याने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे भाव वाढले आहेत. मागच्या आठवड्यात सोलापुरात कांद्याला सरासरी 25 ते 30 रुपये प्रति किलोचा दर होता. आज मात्र भाव 40 ते 45 रुपयापर्यंत पोहोचले आहेत. कांद्याला भाव मिळाला तरीही शेतकरी मात्र समाधानी नाहीत. कारण, कांद्याला चाळीस रुपये भाव मिळाला असला तरीही मागील आठ महिन्यांपासून चाळीत कांदा राहिल्याने त्याचे वजन घटले आहे. त्यामुळे कांद्याला प्रत्यक्ष 40 रुपये भाव मिळाला असला तरी कांद्याचे वजन घटल्याने आम्हाला फारसा फायदा नसल्याची माहिती कांदा उत्पदक शेतकऱ्यांनी दिली आहे.
नवरात्रीचा सण संपताच कांद्याच्या दरात वाढ
नवरात्रीचा सण संपताच कांद्यानं पुन्हा एकदा दराची झेप घेतली आहे. मागच्या दोन दिवसांपासून किरकोळ बाजारात कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मुंबईसह राज्यातील बहुतेक शहरांमध्ये कांद्याच्या भावानं अर्धशतकी मजल मारली आहे. त्यामुळं गृहिणींची चिंता वाढली आहे. नवरात्रीच्या दिवसात कांदा खाणं टाळलं जातं. बहुतेक हिंदू कुटुंबांमध्ये या नऊ दिवसांत जेवणात लसूण आणि कांदा वापरला जात नाही. तसंच, मांसाहार देखील केला जात नाही. त्यामुळं कांद्याचा वापर कमी होतो. त्यामुळं नवरात्रीच्या आधी कांद्याचा भाव काहीसा खाली आला होता. मात्र, आता पुन्हा एकदा कांद्याचा भाव वधारू लागला आहे. त्यामुळं साठेबाजी वाढून भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, कांद्याच्या भाववाढीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी 25 रुपयांवर विकला जाणारा कांदा आता 50 रुपयांवर गेला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना सरासरी 1000 रुपयांपर्यंत जास्त भाव मिळत आहे.
कांद्याचे दर वाढले मात्र, टोमॅटोचे दर घसरले
दरम्यान, गेल्या काही दिवसापूर्वी कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले होते. कारण, कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. याचा फटका शेतकऱ्यांना बसला होता. अनेक शेतकऱ्यांच्या कांदा चाळीतच सडून जात होता. दर नसल्यामुळं कांदा विक्रीस नेऊन त्याचा उत्पादन खर्चही निघणं कठीण होतं त्यामुळं शेतकरी चिंतेत होते. अशातच आता कांद्याच्या दरात वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, कांद्याच्या किंमतीत वाढ झाली असली तरी दुसरीकडं टौमॅटो उत्पादक शेतकरी मात्र अडचणीत सापडला आहे. मागच्या दोन महिन्यापूर्वी टोमॅटोचे दर हे प्रतिकिलोसाठी 150 ते 200 रुपयांवर पोहोचले होते. आता मात्र दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या पाच ते दहा रुपये किलो दरानं टोमॅटोची विक्री केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या: