OLA Scooters साठी आणखी प्रतीक्षा नाही, उद्यापासून सुरू होणार गाड्यांची डिलिव्हरी
पोस्ट-बुकिंग डिलिव्हरीमध्ये विलंब झालेल्या ओला इलेक्ट्रिक स्कूटरची ग्राहकांना आता आणखी प्रतीक्षा करावी लागणा नाही. ओलाचे सीईओ भावीश अग्रवाल यांनी ओला एस वन आणि एस वन प्रो गाड्यांची डिलिव्हरी उद्यापासून सुरू होणार असल्याची माहिती ट्विटमधून दिली आहे. 'गड्डी निकल चुकी' या कॅप्शनसह एक व्हिडिओ ट्विट करून त्यांनी ही माहिती दिली. ओला कंपनीकडून एस वन आणि एस वन प्रो अशा दोन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्यात आल्या आहेत. यातील ओला एस वनची किंमत महाराष्ट्रात 94 हजार 999 रुपये तर ओला एस वन प्रोची किंमत महाराष्ट्रात एक लाख 24 हजार 999 रुपये ठरवण्यात आली आहे. यामध्ये ओला एस वन ही स्कूटर एकदा चार्ज केली की ताशी ९० किलोमीटर्सच्या वेगानं १२० किलोमीटर तर ओला एस वन प्रो ताशी 115 किलोमीटर्सच्या वेगानं 180 किलोमीटरपर्यंत जाऊ शकते असा कंपनीचा दावा आहे.























