Sambhaji Brigade-BJP : भाजप संभाजी ब्रिगेडशी हातमिळवणी करणार? पुरुषोत्तम खेडेकर यांची काय भूमिका?
संभाजी ब्रिगेडला निवडणुकीसाठी युती करण्यासाठी भाजप हाच पर्याय असल्याच संभाजी ब्रिगेडचे प्रमुख पुरुषोत्तम खेडेकर यांनी म्हटलय. मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या राजकीय आघाडीकडून प्रकाशीत होणाऱ्या मराठा मार्ग या मासिकात लेख लिहून पुरुषोत्तम खेडेकर यांनी त्यांची ही भुमिका मांडलीय. संभाजी ब्रिगेड स्थापन होऊन 32 वर्ष झाल्यानंतर संभाजी ब्रिगेडने निवडणुकीच्या राजकारणात उतरायच ठरवल असून आगामी महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागा अशी सुचना या लेखातून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना करताना भाजप हाच युती करण्यासाठी पर्याय असल्याच पुरुषोत्तम खेडेकर यांनी म्हटलय. संभाजी ब्रिगेडची सामाजिक आणि राजकीय भुमिका ही नेहमीच भारतीय जनता पक्षाच्या विरोधात राहिलीय.
मात्र दुसरीकडे पुरुषोत्तम खेडेकर यांच्या पत्नी रेखा खेडेकर या 15 वर्ष भारतीय जनता पक्षाच्या बुलढाणा जिल्ह्य़ातील चिखली विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिल्यात. त्यामुळे अनेक मुद्यांवर पुरुषोत्तम खेडेकर यांची भूमिका भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात दिसत असली तरी त्यांचा भाजपसोबत नेहमीच घरोबा राहिलाय. मधल्या काळात संभाजी ब्रिगेडमधे फुट पडून पुरुषोत्तम खेडेकर यांच्या नेतृत्वाखालील संभाजी ब्रिगेडच्या गटाने राजकीय पक्ष म्हणून निवडणुक लढवायच ठरवल तर प्रविण गायकवाड यांच्यासोबत असलेल्या संभाजी ब्रिगेडच्या दुसऱ्या गटाने सामाजिक संघटना म्हणून काम करायच ठरवलय. पुरुषोत्तम खेडेकर यांनी भारतीय जनता पक्षाला युती करण्यासाठी दिलेल्या या निमंत्रणाला भाजपकडून कसा प्रतिसाद मिळतो हे पहाणं महत्त्वाच असेल.