Meenakshi Shinde UNCUT : पुर्णेकर प्रकरणावर भाष्य, आदित्य ठाकरेंवर टीका, रश्मी ठाकरेंचं नाव घेतलं
Meenakshi Shinde UNCUT : पुर्णेकर प्रकरणावर भाष्य, आदित्य ठाकरेंवर टीका, रश्मी ठाकरेंचं नाव घेतलं
ठाण्यातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याप्रकरणाच्या सूत्रधार असल्याचा आरोप होत असलेल्या शिंदे सेनेच्या नगरसेविका मिनाक्षी शिंदे यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांसमोर येत आपली बाजू स्पष्ट केली. मिनाक्षी शिंदे यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला म्हटले की, माझ्या प्रभागात चितळसर मानपाडा येथे दुर्दैवी घटना घडली, प्रदीप पूर्णेकर यांची हत्या झाली. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. यानंतर गेल्या दोन दिवसांत माझ्यावर सोशल मिडिया आणि प्रसारमाध्यमांवरुन आरोप झाले. पोलिसांनी सुरुवातीला नोंदवलेल्या एफआयआरमध्ये माझ्या नावाचा उल्लेख नव्हता. मात्र, नंतर राजकीय नेत्यांकडून या प्रकरणात माझं नाव गोवण्याचा प्रयत्न झाला. मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं हे राजकारण अत्यंत खालच्या पातळीचे आहे. संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे हे घाणेरडं राजकारण केले जात आहे. ठाणे शहरात स्वत:च्या पक्षाचे अस्तित्व टिकवण्याची त्यांची ही केविलवाणी धडपड सुरु आहे. प्रदीप पूर्णेकर मेल्यानंतर त्यांच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली. त्यांचा मृतदेह गलिच्छ राजकारणासाठी पोलीस स्टेशनच्या बाहेर ठेवण्यात आला. यानंतर पुरवणी एफआयरमध्ये माझे नाव टाकण्यात आले. कोणतेही पुरावे नसताना माझ्यावर बेछूट आरोप करण्यात आले. उद्या कुठे विमान हायजॅक झाले तरी तुम्ही मिनाक्षी शिंदेचं नाव घ्याल. माझ्या 20 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत इतकं घाणेरडं राजकारण मी पहिल्यांदा पाहतेय, असे मिनाक्षी शिंदे यांनी म्हटले.



















