Devendra Fadanvis Full Speech : आम्ही का हरलो ? देवेंद्र फडणवीसांनी A To Z सांगितलं
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी लोकसभा निवडणूक निकालानंतर पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. लोकसभेतील पराभवाची जबाबदारी स्वीकारुन आपण उपमुख्यमंत्री पदावरुन पायउतार होणार असून वरिष्ठांकडे याबाबत विनंती करणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलं होतं. मात्र, फडणवीसांच्या या भूमिकेला पक्षातूनच मोठा विरोध झाला. तर, महायुतीतील (Mahayuti) मित्र पक्षाच्या प्रमुख नेत्यांनीही फडणवीसांची भूमिका मान्य नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर, राजधानी दिल्लीत एनडीएनच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, यासंदर्भातील माहिती त्यांनी जाहीरपणे भाजपच्या बैठकीत दिली. तसेच, मी पळणारा नेता नसून लढणारा नेता असल्याचंही त्यांनी म्हटलं.
"लोकसभा निवडणुकीत राजकीय गणितात आपण कमी पडलो. मी मोकळं करा, हे निराशेतून बोललो नाही. देवेंद्र फडणवीस हा पळणारा व्यक्ती नाही. लढणारा व्यक्ती आहे. चारही बाजूंनी घेरल्यानंतर पुरंदरचा तह करणारे आणि पुन्हा ताकदीने सर्व किल्ले जिंकणारे शिवराय आमची प्रेरणा आहेत. कोणाला वाटलं असेल की मी निराश झालो किंवा भावनेच्या भरात बोललो, तर ते सत्य नाही. माझ्या डोक्यात स्टॅटेजी होती. मी अमित शाह यांना भेटून आलो, त्यांना काय डोक्यात आहे ते सांगितलं. त्यांनी मला सांगितलं आपण महाराष्ट्राची ब्लू प्रिंट तयार करु. मी एक मिनीट देखील शांत बसणार नव्हतो आणि बसणार नाहीये", असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी अमित शाह यांच्यासमवेत झालेल्या बैठकीवरही भाजपच्या पदाधिकारी व आमदारांना माहिती दिली.