CM Eknath Shinde यांचा मेगा प्लॅन, ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या माध्यमातून घडवणार देवदर्शन
CM Eknath Shinde यांचा मेगा प्लॅन, ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या माध्यमातून घडवणार देवदर्शन
राज्यातील एक मोठा मतदार वर्ग आपल्या बाजूने करून घेण्यासाठी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मेगा प्लॅन आखल्याचं समोर आलंय. यासाठी एसटी महामंडळाची मदत घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. राज्यात तब्बल एक कोटींच्या आसपास ज्येष्ठ नागरिक आहेत. या नागरिकांना मोफत देवदर्शन घडवून आणण्यासाठी आता सरकारकडून पुढाकार घेण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. महिन्याच्या प्रत्येक शनिवार- रविवारी जेष्ठ नागरिकांना ही संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी तब्बल 2 हजार एसटी बसेस उपलब्ध करून देण्याची तयारी एसटी महामंडळाने दाखवलीये. महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थस्थळांना जाण्यासाठी ही सेवा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत दिले आहेत. ही सेवा देताना केवळ संबंधित व्यक्तींना आपल्या राहण्याचा आणि जेवणाचा खर्च करावा लागणार आहे. सध्या राज्यात 65 वर्षावरील नागरीकांना 50 टक्के तिकीट तर 75 वर्षांवरील नागरीकांना मोफत प्रवास जाहीर करण्यात आला आहे. एसटी महामंडळाकडून देवदर्शनासाठी जो प्रस्ताव करण्यात येतं आहे त्यामध्ये सर्वच जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची संधी उपलब्ध होणार आहे.



















