Nashik Oxygen Leak : रुग्णालयात 150 रुग्ण व्हेंटिलेटरवर आणि ऑक्सिजनवर होते : नाशिक मनपा आयुक्त
नाशिक : नाशिकच्या नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. या ऑक्सिजन गळतीच्या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. राज्यभरात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा असताना नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. 13 KL क्षमतेचा हा ऑक्सिजन टँक होता. ऑक्सिजन टँकरमध्ये गळती झाल्याने तो सर्वत्र पसरला आहे. या गळतीनंतर ऑक्सिजन पुरवठा तब्बल अर्धा तास खंडित झाला होता.
या दुर्घटनेनंतर रुग्णांच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरु आहे. परिस्थितीचं गांभीर्य पाहता पोलीसही रुग्णालयात दाखल झाले आहेत. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टँकची गळती रोखली असून पुरवठा पूर्ववत झाला आहे. या घटनेत 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयातील एकूण 150 रुग्ण व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर होते. त्यापैकी 131 रुग्ण ऑक्सिजनवर होते आणि 15 रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जाईल, असं नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितलं होतं.
दुसरीकडे शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या गळतीमध्ये 30 ते 35 रुग्ण दगावले असतील, अशी भीती व्यक्त करत जबाबदार व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.