Nanded: मराठा आरक्षणाबाबत आता लोकप्रतिनिधींनी बोलायला हवं, कृती करायला हवी: SambhajiRaje Chhatrapati
आज नांदेड येथे मराठी समाजाच्या वतीनं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मूक मोर्चाची हाक देण्यात आली होती. खासदार संभाजीराजे छत्रपतींच्या नेतृत्त्वात हे आंदोलन पार पडलं. हा लॉकडाऊन नंतरचा मराठा आरक्षणाचा पहिलाच मूक मोर्चा आहे. यावेळी संभाजीराजे छत्रपतींनी आक्रमक पवित्रा घेत मराठा समाजाची भूमिका मांडली. तसेच मराठा आरक्षण मंजूर करण्यासाठी त्यांना काही पर्यायही सुचवले.
मराठा क्रांती मूक आंदोलनात बोलताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, "मी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करण्यासाठी इथं आलो नाही. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा विचार सांगायला आलोय. जर माझं ऐकायचं असेल, तर आपण बोलूच. माझे फोटो काढून काहीच उपयोग नाही. किती फोटो काढायचे?" पुढे बोलताना संभाजीराजे म्हणाले की, "हे खरं तर मराठा क्रांती मूक आंदोलन होतं. मराठा क्रांती मूक आंदोलन म्हणजे काय? तर 58 मोर्चे आपण काढले, या माध्यमातून समाजानं आपली भावना व्यक्त केली की, आपल्याला आरक्षण का पाहिजे? समाज बोलला, समन्वयक बोलले, आम्ही बोललो आता लोकप्रतिनिधिंनी बोलावं आणि बोलत असताना कृतीतूनही दाखवावं, हा माझा संदेश होता."
"खरं तर आज लोकप्रतिनिधी इथं बोलणार होते. ते आपल्या भावना व्यक्त करणार होते. लोकं येतील आणि आपण आज बोलायचं नाही, संभाजीराजेही बोलणार नाहीत. तर लोकप्रतिनिधी सांगतील की, या वर्ष-दोन वर्षात आम्ही काय केलं आणि यापुढे आम्हाला काय करायचं आहे. पण तशी परिस्थिती निर्माण झाली नसून वेगळी परिस्थिती आहे. जे लोकप्रतिनिधी आले आहेत त्यांचं मी स्वागत करतो.", असं संभाजीराजे म्हणाले.
संभाजीराजेंनी बोलताना राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महारांनी केलेल्या कार्याचा दाखला दिला आणि स्वराज्याचा अर्थ समजावून सांगितला. तसेच राजर्षी शाहू महाराजांनी दिलेल्या आरक्षणाबाबतही काही गोष्टी सांगितल्या. स्वराज्य हे अठरापगड जाती आणि बारा बलुतेदारांचं असल्याचं संभाजीराजे यांनी सांगितलं. "आपण संसदेतही मराठा आरक्षणाबद्दलची भूमिका मांडली. मी संसदेतही मराठा आरक्षणाविषयीची भूमिका मांडण्याची मागणी केली. मात्र त्यावेळी मला बोलायची परवानगी दिली नाही. त्यावेळी मला कळलं की, भांडल्याशिवाय आपल्याला काहीही मिळत नाही. आपल्यामागे संपूर्ण मराठा समाज आहे, आपल्याला शिवशाहूंचा वारसा लाभला आहे. पण मग काही खासदारांनीही पाठिंबा दिला आणि मग मला बोलायची संधी मिळाली. त्या खासदारांचेही मी आभार मानतो."