Sachin Vaze : आता सचिन वाझेंचा 'लेटर बॉम्ब'; अनिल परब, अनिल देशमुखांवर गंभीर आरोप, काय आहे पत्रात?
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यानंतर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी लेटरबॉम्ब टाकला आहे. या पत्रात सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नोकरीत पुन्हा घेण्यासाठी दोन कोटींची मागणी केल्याचा आरोप केला आहे. तर शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. जून, ऑगस्ट 2020 मध्ये SBUT ट्रस्टीकडून 50 कोटी गोळा करण्याचाआरोप अनिल परबांवर करण्यात आला आहे. जानेवारी 2021 मध्ये मुंबई महापालिका कंत्राटदाराकडून 2 कोटी रुपये जमा करण्याच्या सूचना दिल्याचाही आरोप आहे.
काय आहे सचिन वाजे यांच्या कथित पत्रात?
जून 2020 रोजी मला सेवेत घेण्यात आले. पण काही लोकांकडून याचा विरोध झाला. अनिल देशमुख यांनी मला बोलावून सांगितले की, शरद पवार तुम्हाला पुन्हा सेवेत घेऊ इच्छित नाहीत. देशमुख यांनी मला पवार साहेबांना पटवून देण्याचे आश्वासन दिले आणि त्यासाठी त्यांनी मला दोन कोटी रुपये मागितले. मग मी देशमुख यांना सांगितले की मी इतके पैसे देऊ शकत नाही. यावर अनिल देशमुख म्हणाले की तुम्ही नंतर पैसेही देऊ शकता. त्यानंतर ऑक्टोबर 2020 मध्ये माझी सीआययूमध्ये नियुक्ती करण्यात आल्यानंतर गृहमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृहात मला बोलावले. मला गृहमंत्र्यांनी आठवण करुन दिली की तुम्हाला दोन कोटी रुपये द्यावे लागतील. त्यावेळीही मी असमर्थता दर्शविली. यानंतर नोव्हेंबर 2020 मध्ये दर्शन घोडावट नावाचा व्यक्ती जो उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अत्यंत जवळचा आहे यांनी माझी भेट घेतली. घोडावट यांनी मला फोन नंबरसह महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे गुटखा व तंबाखूचा पुरवठा सुरू असल्याची माहिती दिली. घोडावट यांनी मला सांगितले की हा गुटखा व्यापार कोटींमध्ये आहे. त्यातून मला महिन्याकाठी 100 कोटी जमा करण्यास सांगितले. त्यावेळी मी असे काहीही करण्यास नकार दिला होता. माझ्या नकारानंतर घोडावट यांनी मला पुन्हा नोकरी जाण्याची धमकी दिली, असा गौप्यस्फोट सचिन वाझे यांनी पत्रात केला आहे.
यानंतर, 2021 मध्ये पहिल्याच दिवशी मी मुंबईतील बेकायदेशीर गुटखा तळघर विरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आणि कोट्यावधींचा अवैध साठाही जप्त केला. त्यानंतर घोडावट मला भेटण्यासाठी माझ्या कार्यालयात आले आणि म्हणाले की, गुटख्यांवर कारवाई केल्यामुळे उपमुख्यमंत्री रागावले आहेत. या गुटखा निर्मात्यांना मला किंवा उपमुख्यमंत्री यांना भेटायला सांगा. पण मी या गोष्टींसही नकार दिला, असं सचिन वाझे यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे.
अनिल परब यांनी बनावट ठेकेदारांकडून 2 कोटींची वसुली करण्यास सांगितले
शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी जुलै आणि ऑगस्ट 2020 मध्ये त्यांच्या शासकीय बंगल्यावर मला बोलावले होते. तेव्हा त्याच आठवड्यात मुंबईतील डीसीपी बदल्या तीन ते चार दिवसात मागे घेण्यात आल्या होत्या. या बैठकीत अनिल परब यांनी मला सांगितले की एसबीयूटीच्या तक्रारींचा आपण शोध घ्यावा आणि तुम्ही एसबीयूटीच्या विश्वस्तांचा सल्ला घ्यावा.तपासाची चर्चा करा असंही सांगितलं. मंत्री अनिल परब यांनी ही चौकशी बंद करण्यासाठी 50 कोटींची मागणी एसबीयूटीकडे करण्यास सांगितले. त्यावेळी मी म्हणालो होतो की मी हे सर्व करू शकत नाही कारण मला एसबीयूटी बद्दल काही माहित नाही आणि या तपासणीवर माझा काहीच ताबा नाही. जानेवारी 2021 मध्ये मंत्री अनिल परब यांनी मला पुन्हा बोलवले आणि सांगितले की तुम्ही बीएमसीमध्ये घोटाळेबाज कंत्राटदाराची चौकशी करावी आणि अशा सुमारे 50 बनावट ठेकेदारांकडून एकूण 2 कोटींची वसुली करण्यास सांगण्यात आले. ही तपासणी अद्याप अगदी प्राथमिक पातळीवर आहे आणि माझी बदली होईपर्यंत त्या तपासणीत मला काहीही आढळले नाही, असं सचिन वाझे यांनी पत्रात लिहिलं आहे.
जानेवारी 2021 मध्ये गृहमंत्र्यांनी पुन्हा मला त्यांच्या अधिकृत बंगल्या ज्ञानेश्वरी येथे बोलावले. त्यावेळी त्यांचे पीए कुंदनही तेथे उपस्थित होते. त्यांनी मला सांगितले की मुंबईत सुमारे 1650 बार आणि रेस्टॉरंट्स आहेत. प्रत्येकी 3-3.50 लाख रुपये वसुली करा. यावर मी गृहमंत्र्यांना सांगितले की ही वसुली मी करु शकतं नाही. या भेटीनंतर लगेचच गृहमंत्रीसमवेत असलेल्या कुंदन यांनी मला गृहमंत्र्यांची आज्ञा पाळण्यास सांगितले. त्यानंतरच तुमचे पद व नोकरी राहील, अशी धमकी दिल्याचं सचिन वाझे यांनी सांगितलं. यानंतर मी आयुक्तांना याबाबत माहिती दिली आणि असेही सांगितले की येत्या काळात मला बनावट प्रकरणात गुंतवले जाऊ शकते. यानंतर आयुक्तांनी मला सांगितले की तुम्ही अशा कोणत्याही गोष्टींमध्ये अडकू नका.