Mumbai Damodar Theator : दामोदर नाट्यगृहावर होतोडा ; प्रशांत दामलेंचा उपोषणाचा इशारा
Mumbai Damodar Theator : दामोदर नाट्यगृहावर होतोडा ; प्रशांत दामलेंचा उपोषणाचा इशारा मुंबईतील परळ येथे असणारे सोशल सर्व्हिस लीगचे दामोदर नाट्यगृह 1 नोव्हेंबर 2023 पासून पुनर्बांधणीच्या कारणांनी बंद आहे. या ऐतिहासिक नाट्यगृहाच्या जागी खासगी शाळेची वास्तू उभारण्याचा प्रस्ताव आहे. याविरोधात नाट्यकर्मींमध्ये नाराजी आहे. नाट्यगृह आहे त्याच जागी तब्बल 900 आसन क्षमतेचे असावे अशी मागणी करण्यात आली आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनात या नाट्यगृहाच्या पुर्नबांधणीच्या कामाचे पडसाद उमटले. त्यानंतर अधिवेशनात नाट्यगृहाच्या तोडकामाला स्थगिती देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, सोशल सर्व्हिस लीगने मे महिन्यापासून पुन्हा तोडकाम सुरू केले.. परळसारख्या मराठमोळ्या भागात असलेले दामोदर नाट्यगृह वाचवण्यासाठी आता अभिनेते-निर्माते आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी कलाकारांसह उपोषणाचा इशारा दिला आहे. मुंबईतील सर्वात जुनं नाट्यगृह म्हणून दामोदर नाट्यगृहाची ओळख आहे. कामगार वर्गातील कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी सोशल सर्व्हिस लीगने 1922 मध्ये या नाट्यगृहाची उभारणी केली होती. मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या सर्वच कलाकारांनी या नाट्यगृहात आपली कला सादर केली आहे. काय आहेत मागण्या? 1) दामोदर नाट्यगृहाच्या जागी बांधण्यात येणाऱ्या शाळेचं आरक्षण रद्द व्हावं. 2) नाट्यगृहाचा वाढीव FSI नाट्यगृहासाठीच वापरला जावा. 3) नाट्यगृह आणि शाळेचं बांधकाम एकाचवेळी सुरू व्हावं. 4) दामोदर नाट्यगृहाच्या काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना आणि सहकारी मनोरंजन मंडळाच्या डोअर किपर्सना पूर्वीप्रमाणेच नव्या नाट्यगृहात काम मिळावं. तोपर्यंत त्यांना पर्यायी रोजगार मिळावा. 5) नव्या दामोदर नाट्यगृहात पूर्वीप्रमाणेच सहकारी मनोरंजन मंडळाचे कार्यालय तसंच तालमीची जागा असावी. त्यासाठी प्रस्तावित आराखड्यात त्याची नोंद असावी. नव्या नाट्यगृहाचे निर्माण होईपर्यंत संस्थेस वापरण्यायोग्य पर्यायी जागा मिळावी.