परप्रांतीय मजूरांची गावी जाण्यासाठी धावपळ; मुंबईतील कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनल्सवर गर्दी
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. मिनी लॉकडाऊननंतर ही कोरोनाचा आकडा वाढत असल्याने सरकार लॉकडाऊन करण्याच्या विचारात असल्याने पुन्हा एकदा लॉकडाऊनची टांगती तलवार राज्यावर आहे. कडक निर्बंधांमुळे आधीच अनेक व्यवसाय ठप्प झाल्याने कामगार बेरोजगार झाले आहेत. त्यातच पुन्हा एकदा लॉकडाऊन झाल्यास गेल्यावेळीप्रमाणे पुन्हा फरफट होऊ नये म्हणून मुंबईच्या कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनल्सवर रात्री परप्रांतिय मजुरांनी गावी जाण्यासाठी गर्दी केली. लॉकडाऊन झाल्यास गेल्यावर्षीसारखी वाईट परिस्थिती ओढावू शकते या भीतीने आता मुंबईत वास्तव्याला असणाऱ्या परराज्यातील कामगारांनी गावी परतण्यासाठी कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनल्स रेल्वे स्थानक गाठलं आहे.






















