(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ganesh Naik | इंटरनॅशनल डॉन मला ओळखतात, घाबरायचं नाही; गणेश नाईक याचं वक्तव्यावर, तर शिवसेना म्हणते
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता जाहीर व्हायच्या आधीच शहरातील वातावरण चांगलेच तापलेले आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्याने ऐन थंडीत नवी मुंबईतील वातावरण तापू लागले आहे. याचदरम्यान भाजपचे नेते गणेश नाईक यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगू लागली आहे. "इंटरनॅशनल डॉन मला ओळखतात घाबरायचं नाही," असं गणेश नाईक म्हणाले. त्याला शिवसेनेनेही उत्तर दिलं आहे. "गणेश नाईक इंटरनॅशनल डॉन असतील तर आम्ही नवी मुंबईत डॉन आहे," शिवसेना नगरसेवक विजय चौगुले यांनी म्हटलं आहे.
तुर्भेमधली भाजपच्या कार्यक्रमात गणेश नाईक बोलत होते. नवी मुंबई महापालिका निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसं फोडाफोडीचं राजकारण रंगलं आहे. निवडणुकीच्या आधीच शिवसेना आणि राष्ट्रवादीने भाजपचे काही नगरसेवक फोडले आहेत. या फोडाफोडीवर भाष्य करताना गणेश नाईक यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. "कोणत्याही गुंडगिरीला घाबरु नका. रात्री अपरात्री मला कधीही फोन करा. इथलेच काय इंटरनॅशनल डॉन सुद्धा मला ओळखतात. त्यामुळे घाबरायची गरज नाही, असं गणेश नाईक यांनी जाहीर भाषणात सांगितलं.
दरम्यान गणेश नाईक यांना शिवसेनेनेही जोरदार उत्तर दिलं आहे. तुम्ही इंटरनॅशनल डॉन असाल तर आम्ही नवी मुंबईतील डॉन असल्याचा पलटवार शिवसेना नगरसेवक विजय चौगुले यांनी केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात ही चिकलफेक चांगलीच रंगणार आहे.