(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vishalgad Stone Pelting : विशाळगडावर भिडेंच्या धारकऱ्यांचा गोंधळ?
Vishalgad Stone Pelting : विशाळगडावर भिडेंच्या धारकऱ्यांचा गोंधळ? विशाळगडाच्या परिसरात रविवारी जिल्हा प्रशासनाने केलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाई आणि त्यापूर्वी झालेल्या हिंसाचारामुळे जिल्ह्यातील वातावरण तणावपूर्ण आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj) यांनी मंगळवारी विशाळगडाला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. यावेळी पोलिसांनी शाहू महाराजांना विशाळगडाच्या (Vishalgad Fort) वादग्रस्त परिसरात जाण्यापासून मज्जाव केला. शाहू महाराजांनी आपल्याला पोलिसांनी अडवल्याचे सांगितले. यानंतर शाहू महाराजांनी विशाळगडाच्या परिसरातील तोडफोड झालेल्या मशिदीची पाहणी केली. यावेळी स्थानिकांनी आपल्या व्यथा शाहू महाराजांसमोर मांडल्या. विशाळगड परिसरातील जिल्हा प्रशासनाच्या कारवाईनंतर कोल्हापूरमधील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. शाहू महाराज यांचे पुत्र संभाजीराजे यांनी गेल्या काही दिवसांपासून विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. यानंतर संभाजीराजे छत्रपती विशाळगडाच्या परिसरात गेले होते तेव्हा काहीजणांचा जमाव हिंसक झाला होता आणि त्यांनी विशाळगडाच्या परिसरात तोडफोड केली होती. या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांनी नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची पाहणी केली होती. शाहू महाराज मंगळवारी विशाळगडाची पाहणी करण्यासाठी गेले होते तेव्हा त्यांनी ज्या मशिदीती तोडफोड झाली तिथे जाऊन आढावा घेतला. यानंतर शाहू महाराज यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. यावेळी शाहू महाराजांना पाहताच मुस्लीम महिलांनी टाहो फोडत आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. रविवारी विशाळगडाच्या परिसरात काय घडलं? कशाप्रकारे तोडफोड करण्यात आली? कोणाचं नाव घेऊन तोडफोड केली जात होती, याची माहिती स्थानिकांनी शाहू महाराजांना दिली. आम्ही उभ्या आयु्ष्यात असा प्रकार कधी पाहिला नव्हता. आम्ही इकडे-तिकडे पळून गेलो म्हणून जीव वाचला, असे स्थानिकांनी सांगितले. शाहू महाराजांनी विशाळगडाच्या परिसरात घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेचा निषेध केला होता. विशाळगड परिसरात नुकसान झालेल्यांना सरकारने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी देखील शाहू छत्रपती यांनी केली होती. ही घटना म्हणजे जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचे अपयश असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप ज्या शाहूंनी देशाला समता शिकवली त्यांच्या वारसाला अडवलं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. ज्यांना अडवायला पाहिजे होत त्यांना अडवलं नाही. हा सरकारचा प्लॅन आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. काल पाठवलेले धारकरी होते, त्यांना कोणी पाठवलं हे मला सांगायला लावू नका, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.