Raj Thackeray & Eknath Shinde: एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, राज ठाकरेंना युतीची ऑफर?
MNS chief Raj Thackeray: आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याची चर्चा सुरु असताना मंगळवारी सकाळी शिंदे गटाचे नेते उदय सामंत (Uday Samant) अचानक राज यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये साधारण पाऊस तास चर्चा झाली. यावेळी उदय सामंत यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती करण्याचा प्रस्ताव मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकीकडून उद्धव ठाकरे कधी नव्हे ते युतीसाठी सकारात्मक असताना आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडूनही युतीचा प्रस्ताव आल्याने राज ठाकरे काय निर्णय घेतात, हे बघावे लागेल.
विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या युतीबाबत योग्य चर्चा झाली नसल्यामुळे दादर आणि वरळी विधानसभा मतदारसंघात घोळ दिसून आला होता. दादर विधानसभा मतदारसंघांमध्ये राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरले असताना शिवसेनेने सदा सरवणकर यांना ऐनवेळेस तिकीट दिले. यानंतर राज ठाकरे आणि शिवसेना यांच्यामध्ये शाब्दिक संघर्ष दिसून आला होता. युतीबाबत आणि सीट शेअरिंगबाबत योग्य चर्चा झाली नसल्याचा आरोपही करण्यात आला.
आता पुन्हा महापालिका निवडणुका चार महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. यावेळी सीट शेअरिंगबाबत कोणतीही चुकीची चर्चा होऊ नये यासाठी दोन्ही राजकीय पक्ष आग्रही आहेत. चर्चेला मागच्या वेळ प्रमाणे उशीर होऊ नये यासाठीची खबरदारी दोन्ही राजकीय पक्ष घेत आहेत, असे सांगितले जात आहे.





















