Sharad Pawar Satara : माझ्या तिसऱ्या बंधूंचे सुपुत्र आज राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत
सातारा : लष्करात मुली यायला पाहिजेत यासाठी प्रयत्न केल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. त्यावेळी लष्करी अधिकारी मला सांगत होता की, हे मुलींकडून होणार नाही. मी बोललो की संरक्षण मंत्री मी आहे. हा निर्णय मी करून घेतल्याचे पवार म्हणाले. रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी पवार साताऱ्यात आले होते, यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.
पुणे-मुंबईसारख्या शहरात ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थी विविध पदावर अधिकारी म्हणून गेलेत याचा अभिमान आहे. सगळ्यांनी शेती करण्याच्या ऐवजी घरातील एकाने उत्तम शेती करावी. बाकीच्यांनी संधी मिळेल त्या ठिकाणी काम करून आपलं नाव कमवावे असा सल्लाही यावेळी शरद पवार यांनी दिला. सगळ्यांनी शेती केली तर चालणार नाही, हे कर्मवीर अण्णांना माहिती होतं. केरळमध्ये अनेकजण भेटले की सोन्याच्या धंद्यात यशस्वी झालेले पाहायला मिळतात. हे सगळं ज्ञानातून, आत्मविश्वासातून येते असेही ते म्हणाले.
नव्या पिढीला शैक्षणिकदृष्टीने समृद्ध करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचं वैशिष्ट्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जात पात पाहिली नाही. रयतेचे राज्य म्हणून हिंदवी स्वराज्याकडे पाहिलं जातं. सातारा जिल्हा हा स्वतंत्र चळवळीतील महत्वाचा जिल्हा आहे. आता स्वतंत्र मिळालं, आता ज्ञान मिळवणं हे गरजेचं आहे. हे भाऊराव पाटील यांनी ओळखलं होत. त्यामुळेच त्यांनी रयत शिक्षण संस्थेचं रोपटं लावलं. त्याचीच ही एक इमारत असल्याचे पवार म्हणाले.