Sanjay Shirsat On Anand Dighe Death : आनंद दिघेंना मारलं गेलं, ठाणे जिल्ह्याला माहिती -शिरसाट
मुंबई : दिवंगत शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गुरुस्थानी असलेल्या आनंद दिघे यांच्या जीवनपटाचा भाग 2 म्हणजेच धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा बहुचर्चित सिनेमा शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. अपेक्षेप्रमाणे शिवसेना शिंदे गटाकडून या चित्रपटाचे स्क्रिनींग अनेक ठिकाणी मोफत करण्यात आले. तर, शिंदेंच्या शिवसैनिकांनी चित्रपटावर चर्चाही सुरू केली आहे. मात्र, ऐन विधानसभा निवडणुकांच्या (Election) तोंडावर हा चित्रपट प्रदर्शित करत शिंदेंच्या शिवसेनेकडून राजकीय नेरेटीव्ह पसरवला जात असल्याचा आरोप केला जातोय. तर, आनंद दिंघेंना बाळासाहेब ठाकरेंपेक्षा मोठं करण्याचा प्रयत्न होतोय, अशी थेट टीका संजय राऊत यांनी केलीय. आता, धर्मवीर 2 सिनेमावरुन शिंदेंचे आमदार संजय शिरसाट आणि आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्यात जुंपल्याचं दिसून आलं.
धर्मवीर 2 सिनेमाबाबत बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, चित्रपट पाहताना घटनाक्रम पाहायला हवी. काही लोकांना असं वाटत की शिवसेना त्यांच्यापासून जन्मली, पण असे नाही ती बाळासाहेबांनी बनवली. दिघे साहेब यांनी जे घडवले त्यावर पाणी फिरण्याचे काम करतात. आनंद दिघे हे एकनाथ शिंदे यांच्या स्वप्नात आल्याचे दाखवले तर त्याला वेगळा संदर्भ लावू नका, असे संजय शिरसाट यांनी म्हटलं. त्यांच्या अकलेचा कमीपणा दिसतो. दिघे साहेब ठाण्यापासून मातोश्रीवर जायचे तो काळ तसा होता. आता मातोश्रीवर गेल्यावर अस समजते की हे लोक सिल्व्हर ओकवर असतात, आम्हाला तिकडे जायचं नव्हत म्हणून आम्ही गुवाहाटीला गेलो, असेही शिरसाट यांनी म्हटले. तसेच, आनंद दिघे यांना मारलं गेलं, अख्खा ठाणे जिल्हा जाणतो की त्यांचा घातपात झालाय, असा गंभीर आरोपही संजय शिरसाट यांनी केला आहे. आता, शिरसाट यांच्या आरोपावर आनंद दिघेंचे दुसरे शिष्य आणि ठाण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी पलटवार केला आहे.