Sangli Unlock : सांगली जिल्हा तिसऱ्या स्तरात, निर्बंधात शिथिलता; काय सुरु, काय बंद?
सांगली : कोविड पॉझिटिव्हिटी रेटनुसार सांगली जिल्हा तिसऱ्या स्तरात गेला आहे. त्यामुळे आजपासून जिल्ह्यात निर्बंधांमध्ये आणखी शिथिलता देण्यात येत आहे. सांगली जिल्ह्याचा मागील आठवड्यात पॉझिटिव्हिटी रेट 11 टक्के इतका होता. आठवडाभरात पॉझिटिव्हिटी दरात घट झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. आजचा पॉझिटिव्हिटी रेट 7.86 टक्के आहे. 14 जून 2021 रोजी सकाळी 5 वाजल्यापासून 21 जून 2021 सकाळी 5 वाजेपर्यंत हे निर्बंध लागू असतील.
कोविड पॉझिटिव्हिटी रेट आणि व्यस्त ऑक्सिजन बेड टक्केवारीनुसार राज्यातील जिल्ह्यांना 1 ते 5 स्तर (Level) मध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. 10 जून 2021 रोजी संपणाऱ्या आठवड्याचा सांगली जिल्ह्यातील कोविड पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांपेक्षा जास्त पण 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे आणि व्यस्त ऑक्सिजन बेड टक्केवारी 25 टक्क्यापेक्षा जास्त पण 40 टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या आदेशानुसार सांगली जिल्ह्याचा स्तर 3 (level 3) मध्ये आल्याने, या स्तराचे निर्बंध सांगली जिल्ह्यात लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केले आहेत.