Rajendra Shingne on Ajit Pawar : नाईलाजाने अजित पवार यांच्यासह जावं लागलं, शिंगणेंचा गौप्यस्फोट
Rajendra Shingne on Ajit Pawar : "मध्यंतरी माझ्या जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे आणि नाइलाजाने मी अजित दादांसोबत गेलो. आज राज्य सहकारी बँकेला राज्य सरकारने तीनशे कोटी दिले आहेत. परंतु निश्चितपणे आदरणीय शरद पवार माझ्यासाठी आदरणीय राहील", अशी कबुली अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे. ते वर्धा येथे बोलत होते.
मागील दोन अडीच वर्षांपासून शरद पवारांशी संबंध तोडले असं काही नाही
राजेंद्र शिंगणे म्हणाले, सुरेश देशमुख यांच्या अमृत महोत्सव समितीत होतो, त्यामुळे मी आलो. आदरणीय पवार साहेब जेव्हा आले तेव्हा आम्ही कार्यालयात बसलो होतो काही वेगळ्या विषयावर चर्चा झाली. परंतु राजकीय चर्चा झाली नाही. मी जरी अजितदादांच्या गटात सामील जरी झालो असलो तरी मागील दोन अडीच वर्षांपासून शरद पवारांशी संबंध तोडले असं काही नाही. आजही मी त्यांना नेता मानतो. मागील दोन वर्षात वेळोवेळी जाहीर भाषणातून आणि वैयक्तिक बोलण्यातून असेल मी शरद पावरांचं नाव मी राज्यातील मोठे आणि लोकनेते म्हणून घेत आलो आहे.