Pooja Chavan Death Case | संजय राठोड गायब नाहीत, ते संपर्कात आहेत : अजित पवार
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणावरुन राज्यातील राजकारणात वादंग सुरु आहेत. अशातच या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून संजय राठोड नॉट रिचेबल असल्याचं बोललं जात होतं. परंतु, संजय राठोड गायब नसून संपर्कात असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. तसेच धनंजय मुंडे यांच्यावरही काही दिवसांपूर्वी आरोप करण्यात आलं होते, त्यावेळी त्यांचा राजीनामा घेतला असता तर ते चुकीचं ठरलं असंत, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलताना सांगितलं.
संजय राठोड यांच्यासंदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "मला अशी माहिती मिळाली की, गुरुवारी ते याप्रकरणी खुलासा करणार आहेत. माझा आणि त्यांचा काही संपर्क झालेला नाही. पण त्यांच्यावर जे आरोप केले जात आहेत, त्यासंदर्भात आम्ही स्वतः सांगितलं, राज्याच्या प्रमुखांनी सांगितलं की, कोणावरही काही आरोप करण्यात आले तर त्याची रितसर चौकशी झाली पाहिजे, त्या प्रकरणाची चौकशी सध्या पुणे पोलीस करत आहेत. याप्रकरणी काही लोकांना अटकही करण्यात आलेली आहे. पण जोपर्यंत चित्र स्पष्ट होत नाही, तोपर्यंत निष्पाप व्यक्तीचं नाव घेऊन कारण नसताना त्यांना संशयाच्या भोवऱ्यात टाकणं हे फार उचित नाही." पुढे बोलताना ते म्हणाले की, "काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्या बाबतीतही असंच झालं. वास्तविक राजकीय क्षेत्रात अनेक वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करणारी ती व्यक्ती आहे. यासंदर्भात ज्या मुलीबाबत ही घटना घडलेली आहे. तिनं आत्महत्या केली असं सांगितलं जात आहे. चौकशीमध्ये खरं काय आहे ते पुढे येईल. पण तिच्या वडीलांचं स्टेटमेंट मी स्वतः टीव्हीवर पाहिलं. पण वडीलांनी सांगितलं की, आमच्यावर कर्ज झालं होतं. तिने पोल्ट्रि व्यवसाय सुरु करण्याचा प्रयत्न केला पण, दुर्दैवानं बर्ड फ्लू आणि कोरोनामुळे तो व्यवसाय अडचणीत आला."
"याप्रकरणी एकाला ताब्यात घेतलं आहे. आणखी काही लोकांना ताब्यात घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. पोलीस त्यांच्या पद्धतीनं काम करत आहेत. माझं असं म्हणणं आहे की, एखाद्या मोठ्या व्यक्तीचं नाव आल्यानंतर त्याला वेगळ्या प्रकारची प्रसिद्धी मिळत असते. तसं घडतंय का काय? पण आमचेही हे अंदाज आहेत. चौकशीनंतर चित्र स्पष्ट होईल." असं अजित पवार म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, "आताच्या घडीला ती व्यक्ती निराधार आहे, ही वस्तुस्थिती खरी आहे. काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्या बाबतीतही असेच आरोप करण्यात आले होते. त्यावेळी जर माहिती नसताना राजिनामा घेला असता तर, कारम नसताना त्यांची बदनामी झाली असती. त्यानंतर जिनं तक्रार केली त्याच मुलीनं काय सांगितलं हेसुद्धा आपण सर्वांनी ऐकलं. त्यामुळे याप्रकरणी कोणालाच पाठिशी घालण्याचं कारण नाही. पण चौकशी होऊन संपूर्ण चित्र स्पष्ट होत नाही, तोपर्यंत एखाद्याला दोषी धरायच किंवा एखाद्याला त्या पदावरून हटवायचं. हे कितपत योग्य आहे हा, विचार करण्याचा भाग आहे. अर्थात संजय राठोड शिवसेनेचे नेते आहेत आणि शिवसेनाच त्यासंदर्भात भूमिका घेऊ शकते."