अनिल देशमुखांना दुसरीकडे घर घेऊन द्या किंवा तुम्हीच त्या ठिकाणी राहिला जा : Jayant Patil
मुंबई : "अरे त्या अनिल देशमुखांच्या घरी किती वेळा धाडी मारालं, थोडं तरी तारतम्य बाळगा.. माझं तर म्हणणं आहे देशमुख कुटुंबियांना भाड्याने घर घेऊन द्या आणि तुम्हीचं कायमचे त्यांच्या घरी राहिला जा", अशा शब्दात केंद्रीय तपास यंत्रणांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टोला लगावला.
या छापेमारीबाबत अधिक बोलताना जयंत पाटील म्हणाले की, सध्या केंद्र सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात विरोध वाढत आहे. आज महाराष्ट्र बंद कडकडीत पाळला गेला आहे. यावरून भाजप विरोधी चित्र आता स्पष्ट व्हायला लागले आहे. आशा काळात माध्यमांवरील बातम्या हटवण्यासाठी जाणीवपूर्वक महाविकास आघाडीच्या नेत्यांवर धाडी मारण्याचा प्रकार केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून भाजप करत आहे. माझं त्या केंद्रीय यंत्रणांना सांगणं आहे की अरे कितीवेळा अनिल देशमुख यांच्या घरावर तुम्ही छापे मारणार आहेत. एकदा दोनदा, तीनदा, चारदा, पाचवेळा अरे त्यापेक्षा अनिल देशमुख यांच्या घरी राहिलाच जावा आणि देशमुख कुटुंबियांना दुसरीकडे भाडयाने घर घेऊन द्या अशा शब्दांत जयंत पाटील यांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा समाचार घेतला.
दरम्यान आजच्यासंपा बाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, भाजपकडून या बंदला विरोध म्हणजे शेतकऱ्यांना चिरडून मारण्याचं अप्रत्यक्ष समर्थन आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली. लखीमपूरमधील हत्याकांडाची तुलना केवळ जालियनवाला बाग हत्याकांडाशीच होऊ शकते. त्याचा महाराष्ट्रातील घराघरातून निषेध होईल असेही जयंत पाटील म्हणाले.
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आणि आमचे मित्रपक्ष यांच्यावतीने हा बंद आम्ही पुकारला आहे. भाजप आजपर्यंत देशातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत होती. दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. पण लखीमपूरसारखी घटना जाणीवपूर्वक केलेलं हत्याकांड आहे असा थेट आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला.
भाजपाच्या मंत्र्यांच्या चिरंजीवाने हे हत्याकांड केलंय. अद्यापही त्याला अटक होत नाही, त्याला सन्मानाने बोलावलं जातं. भाजपाला शेतकऱ्यांचं आंदोलन चिरडण्याचं काम करायचं आहे. त्याचा निषेध म्हणून मविआच्या सर्वच पक्षांनी हा बंद पुकारला आहे. सरकारचा या बंदशी सूतराम संबंध नाही. भाजपने केलेल्या या कृत्याचा निषेध म्हणून जनताच उत्स्फूर्तपणे सहभागी झाली आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.