(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Narayan Rane vs Uddhav Thackeray : स्वत: मुख्यमंत्र्यांनी दिले नारायण राणेंच्या अटकेचे आदेश?
मुंबई : कालचा दिवस हा महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्वाचा दिवस. सोमवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांविरोधात एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि मंगळवारी त्यावरुन राजकीय धुरळा उडाला. यासंदर्भात आता एक महत्वाची माहिती हाती आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेची आखणी सोमवारी वर्षा बंगल्यावरच करण्यात आली होती. त्यानुसार गुन्हा कुठे दाखल करायचा? कोणी काय भूमिका घ्यायची याची अंमलबजावणी मंगळवारी सकाळपासून करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. नारायण राणे यांना अटक करण्यासंदर्भात सर्व माहिती शरद पवार यांना देण्यात आली होती. त्यांच्या परवानगी नंतरच कारवाईला सुरवात झाली, अशीही माहिती मिळाली आहे. कारण गृह विभाग राष्ट्रवादीकडे असून महत्त्वाची जबाबदारी गृह विभागाकडे होती.
नारायण राणे यांच्या कारवाई संदर्भात महाविकास आघाडीतील तीनही पक्षातील नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर कारवाई करण्यात आली. नारायण राणे यांना मुंबई पोलिसांनी अटक केली तर मुंबईत मोठा गोंधळ होऊ शकतो म्हणून नाशिक या ठिकाणी पहिला गुन्हा दाखल करण्यात आला, अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.