Monsoon 2021 : केरळमध्ये येत्या 24 तासात मान्सून दाखल होण्याची शक्यता, राज्यातही पाऊस बरसणार
भारतीय किनारपट्टी भागांमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी पूरक वातावरण तयार होत असतानाच दोन चक्रीवादळं निर्माण होऊन गेली असली, तरीही मान्सून (MONSOON) काही वाट चुकलेला नाही. कारण, ठरल्याप्रमाणे हा दरवर्षी येणारा आणि हवाहवासा पाहुणा येत्या 24 तासात केरळात दाखल होण्याची शक्यता आहे.
केरळातील अनेक भागात ढगाळ वातावरण झाले असून अनेक ठिकाणी पावसाला अनुकूल असे वातावरण तयार झाले आहे. हवामान विभागाने निश्चित केलेल्या केरळमधील 14 स्टेशनवर चांगला पाऊस होत आहे. तसेच उद्यापासून केरळात पावसाचा जोर अधिक वाढण्याचा अंदाज आहे.
राज्यात पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, अहमदनगर, कोकणात रत्नागिरी आणि मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर तसंच विदर्भातील काही भागात विजेच्या कडकडाटसह पुढील तीन तासात पावसाचा इशारा हवामानविभाग तज्ज्ञ होसाळीकर यांनी दिला आहे. मुंबई आणि पुण्यात ढगाळ वातावरण राहणार आहे.