Mohan Bhagwat on Election : प्रचारात टेक्नॉलॉजीचा अयोग्य वापर
Mohan Bhagwat : "एका वर्षांपासून मणिपूर शांततेची वाट पाहत आहे. त्यापूर्वी दहा वर्ष मणिपूर शांत होतं. मात्र, अचानक तिथे अशांतता निर्माण झाली, किंवा निर्माण करण्यात आली. त्या आगीत मणिपूर आज ही जळत आहे, त्राही त्राही करत आहे, त्याकडे कोण लक्ष घालणार?" असा सवाल राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला आहे. ते एवढ्यावरच थांबले नाही, तर पुढे मणिपूरकडे प्राधान्याने लक्ष घालणे आवश्यक आहे, याची आठवण ही त्यांनी सरकारला करून दिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या "कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीय"च्या समापन सोहळ्यात आज सरसंघचालक डॉ मोहन भागवत स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. यावेळी ते बोलत होते.
संघासारख्या संघटनाना ही नाहक ओढण्यात आले
मोहन भागवत म्हणाले, निवडणूक लढवताना एक मर्यादा असते, मात्र, यंदा देशातील निवडणुकीत त्या मर्यादेचा पालन झालं नाही. प्रचारातील वक्तव्यांमुळे समाजात तेढ निर्माण होईल याचा विचार ही केला गेला नाही. त्यामध्ये संघासारख्या संघटनाना ही नाहक ओढण्यात आले. टेक्नॉलॉजीचा वापर करून असत्य मांडले गेले. हे योग्य नाही. सरसंघचालक मोहन भागवत यांनी निवडणुकीनंतर त्यांच्या पहिल्याच भाषणात निवडणुकीतील यंदाच्या प्रचारावर व्यक्त तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.